‘कोविड’ काळात कुणाचेही हाल होऊ देणार नाही

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

‘कोविड’ रुग्णांची आबाळ होऊ नये तसेच कुणाचेही हाल होऊ नयेत, यासाठी भाजपचा पदाधिकारी या नात्याने माझे नेहमी ‘कोविड’ग्रस्त भागात कार्य सुरू राहील, असे आश्वासन भाजपचे प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक यांनी दिले.

 

मडकई: जगभरातील ‘कोरोना’चे संकट अजूनही संपलेले नाही. याचा संसर्ग अजूनही पसरत असल्याने आजही ‘कोविड’ रुग्ण सापडत आहेत. यामुळे अनेकांसमोर आर्थिक व आरोग्याच्याबाबतीत अडचणी निर्माण झाली आहे. ‘कोविड’ रुग्णांची आबाळ होऊ नये तसेच कुणाचेही हाल होऊ नयेत, यासाठी भाजपचा पदाधिकारी या नात्याने माझे नेहमी ‘कोविड’ग्रस्त भागात कार्य सुरू राहील, असे आश्वासन भाजपचे प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक यांनी दिले.

रामनाथी देवस्थान परिसरातील ‘कोविड’ग्रस्त रुग्णांच्या कुटुंबियांना अन्नधान्य वितरीत कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजप मंडळाचे सरचिटणीस संतोष रामनाथकर, युवा भाजप मंडळाचे कार्यकर्ते सौरभ लोटलीकर, तळुले-बांदोडा येथील स्वाभीमानी कार्यकर्ते तुळशीदास (बाबा) नाईक व इतर भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
दत्तप्रसाद नाईक म्हणाले, बांदोड्यातील रामनाथी भाग हा ऐतिहासिक आहे. या ठिकाणी देवदेवतांच्या मंदिरांना ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यामुळे या पुण्यभूमीत ‘कोविड’चा फारसा प्रभाव पडणार नाही. ‘कोविड’ हे संकट आज असले तरी येथील देवदेवतांच्या आशीर्वादामुळे निश्चितच कायमचे हटणार आहे. येथील लोकांवर देवदेवतांचा वरदहस्त असल्याने ‘कोविड’सारख्या संकटाला घाबरण्याचे काहीच कारण नसल्याचेही ते 
म्हणाले.
यावेळी संतोष रामनाथकर व सौरभ लोटलीकर यांनीही भाजपच्या विविध योजनांची माहिती देऊन त्याचा लाभ नागरिकांनी घेण्याचे आवाहन केले. ‘कोविड’ हा सांसर्गिक रोग असला तरी सामाजिक अंतर राखून याला हद्दपार करता येते. त्यामुळे नागरिकांनी सामाजिक अंतर राखावे, असे आवाहनही रामनाथकर व लोटलीकर यांनी 
केले.
यावेळी दत्तप्रसाद नाईक यांच्यातर्फे रामनाथी देवस्थानच्या परिसरातील लोकांना अन्नधान्याचे वाटप केले. तुळशीदास नाईक यांनी स्वागत 
केले.

संबंधित बातम्या