दवर्ली - दिकरपालवासीयांसाठी दोन स्वस्त धान्य दुकाने सुरू होणार

dainik gomantak
गुरुवार, 21 मे 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्याने लोकांना वेळोवेळी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होणे गरजेचे आहे.

सासष्टी, 

कोरोनाच्या काळात दवर्ली - दिकरपाल पंचायत क्षेत्रात एकच स्वस्त धान्याचे दुकान असल्याने जीवनावश्यक वस्तूंसाठी रेशनकार्डधारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून यासंबंधी पंचायतीने नागरी पुरवठा खात्याच्या मान्यतेनुसार पंचायत क्षेत्रात दवर्ली आणि दिकरपालच्या ग्रामस्थांसाठी दोन स्वस्त धान्यांची दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दोन्हीही दुकाने शिस्तबद्ध पद्धतीने दोन आठवड्यात सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती नावेलीचे आमदार लुईझिन फालेरो यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्याने लोकांना वेळोवेळी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होणे गरजेचे आहे. सध्या पंचायत क्षेत्रात एकच स्वस्त धान्याचे दुकान आहे. हे दुकान लहान असल्याने एकाला वस्तू देण्यास दुकान मालक १५ ते २० मिनिटांचा वेळ घेत असून दिवसाला फक्त ३० ते ४० लोकांना सामान देणे शक्य होत आहे. पंचायत क्षेत्रात सुमारे २००० रेशनकार्डधारक असून स्वस्त धान्याचे दुकान महिन्याला फक्त २१ दिवसच चालू असल्याने सर्व लोकांना वेळोवेळी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होणे शक्य नाही. त्यामुळे दोन दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे आमदार लुईझिन फालेरो यांनी सांगितले.
दवर्ली - दिकरपाल पंचायत क्षेत्रात दोन रेशन दुकाने सुरू करण्यासंबंधी नागरी पुरवठा खाते, पंच, सरपंच यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली असून पंचायतीच्या खाली असलेल्या जागेत दुसरे दुकान सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खात्याचे संचालक सिद्धिविनायक नाईक यांनी या दुकानाला मान्यता दिलेली असून सर्व सोपस्कार पूर्ण करून येत्या दोन आठवड्याच्या काळात दोन्ही दुकाने सामाजिक अंतर राखून शिस्तबद्ध पद्धतीने सुरू करण्यात येतील, असे फालेरो यांनी सांगितले.

संबंधित बातम्या