आग्वाद किल्ल्याचा मुख्‍यमंत्र्यांकडून आढावा

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 8 जानेवारी 2021

आग्वाद येथील पूर्वीच्या कारागृहाचे आता गोवा मुक्तीपर्व स्मृतिस्थळ म्हणून रुपांतर करण्यात आले आहे.

पणजी: आग्वाद येथील पूर्वीच्या कारागृहाचे आता गोवा मुक्तीपर्व स्मृतिस्थळ म्हणून रुपांतर करण्यात आले आहे. मार्चमध्ये या प्रकल्पांचे लोकार्पण केले जाणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकल्पाच्या कामाचा आज आढावा घेतला. गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष दयानंद सोपटे यांनी आग्वादच्या किल्ल्यात सुरू असलेल्या कामाची पाहणी केली.

बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आग्वाद येथील पूर्वीच्या कारगृहाचे गोवा मुक्तीच्या स्मृती जपणारे स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी पायाभूत सुविधा, दुरुस्ती, नूतनीकरण यांचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या वा दुसऱ्या आठवड्यात त्या कामाची पाहणी केली जाणार आहे. त्या ठिकाणी गोवा मुक्तीच्या स्मृती कशा प्रकारे जपल्या जाव्यात, यासंदर्भात स्वातंत्र्यसैनिकांच्या संघटनांचे प्रतिनिधी, इतिहास अभ्यासक, पुरातत्व संशोधक यांची बैठक आज घेतली. त्यांनी काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. त्या सर्व सूचनांचे पालन सरकार करणार आहे. सरकारने त्या सूचना नोंदवून घेतल्या आहेत. 

बैठकीस उपस्थित ग्रामीण विकासमंत्री मायकल लोबो यांनी सांगितले, की राम मनोहर लोहिया आणि टी. बी. कुन्हा यांचे पुर्णाकृती पुतळे आग्वादमध्ये असतील. ते कोठडीत आहेत असे दर्शवणारा देखावा तयार केला जाईल. त्यासाठी त्या काळातील साहित्याचाच वापर केला जाणार आहे. आग्वाद किल्ल्यावर तोफा पूर्ववत बसवण्यात आल्या आहेत. आग्वादमध्ये एक फाशी देण्याची जागा आहे. गोवा मुक्तीनंतर एकास तेथे फाशीही दिले गेले आहे. त्या स्थळाचे संवर्धन होणार आहे. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या कल्पकतेतून हा प्रकल्प मार्गी लागला आहे. या बैठकीस उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर, पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष दयानंद सोपटे, व्यवस्थापकीय संचालक निखिल देसाई, स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली, पांडुरंग कुंकळ्येंकर, प्रा. प्रजल साखरदांडे आदी उपस्थित होते.

आणखी वाचा:

मेळावलीतील आयआयटी प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव ? -

संबंधित बातम्या