उपचार दिरंगाईमुळेच देशप्रभूंचा मृत्यू

dainik gomantak
शनिवार, 9 मे 2020

तीन सदस्यीय समितीमार्फत चौकशी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू झाली आहे.
माजी आमदार जितेंद्र देशप्रभू यांना उपचारासाठी आपत्कालिन प्रभागात (कॅज्युल्टी वॉर्ड) आणल्यापासून ते त्यांच्यावर झालेले उपचार व डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे संध्याकाळी झालेला मृत्यू यासंदर्भातील माहिती उघड झाली होती.

पणजी, 

‘कोविड - १९’च्‍या विरोधात राज्य सरकार लढा देत असताना पेडण्याचे माजी आमदार जितेंद्र देशप्रभू यांचा गोमेकॉ इस्पितळात मृत्यू झाला होता. त्‍यांच्‍या मृत्यूप्रकरणी संशय व्यक्त करण्यात आला होता. विरोधकांकडून यासंदर्भात टीकाही झाली होती. याप्रकरणी केलेल्‍या प्राथमिक चौकशीत देशप्रभू यांचा मृत्यू हा वेळेत उपचार न झाल्याने डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. त्यामुळे एका वरिष्ठ निवासी महिला डॉक्टरला निलंबित केले आहे. आणखी एका महिला डॉक्टरलाही निलंबित करण्याची शक्यता आहे. तीन सदस्यीय समितीमार्फत चौकशी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू झाली आहे.
माजी आमदार जितेंद्र देशप्रभू यांना उपचारासाठी आपत्कालिन प्रभागात (कॅज्युल्टी वॉर्ड) आणल्यापासून ते त्यांच्यावर झालेले उपचार व डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे संध्याकाळी झालेला मृत्यू यासंदर्भातील माहिती उघड झाली होती. त्यामुळे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी याप्रकरणाची प्राथमिक चौकशीचे निर्देश दिले होते. दरम्‍यान, रेडिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. जीवन वेरेकर यांना या प्रकरणात सरकारने ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. आरोग्‍य खात्‍याच्‍या अवर सचिव तृप्‍ती मणेरकर यांनी ही नोटीस बजावली आहे.

‘त्‍या’ दिवशी नेमके काय झाले?
देशप्रभू यांना श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने २१ एप्रिल रोजी दुपारी २.३० वा.च्या सुमारास गोमेकॉ इस्पितळात आपत्कालिन प्रभागात आणण्यात आले होते. श्‍वास घेताना त्यांना त्रास होत होता. त्यामुळे त्यांना ‘कोविड - १९’च्या अलगीकरण विभागात नेण्यात आले. त्यांची ‘कोविड - १९’ बाबत त्वरित चाचण्या करण्यात आल्या होता. यावेळी या अलगीकरण विभागात असलेल्या डॉक्टरांनी त्यांचे तातडीने सिटी-स्कॅन करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. त्यामुळे त्यांना सिटी-स्कॅन करण्यासाठी रेडिओलॉजी (क्ष किरणशास्त्र व किरणोत्सर्गाचे शास्त्र) या विभागात नेण्यात आले.

सिटी स्‍कॅनसाठी पाठवले आणि...
आमदार देशप्रभू यांची प्रकृती अतिशय बिकट होत चालली असताना सिटी-स्कॅन विभागात त्यांना नेण्यात आले. तेथील डॉक्टर्स तसेच टेक्निशियन हे जेवायला गेले होते. सकाळपासून या विभागात एक वरिष्ठ निवासी व २ कनिष्ठ निवासी डॉक्टर्स व टेक्निशियन होता. मात्र, दुपारी हे सर्वजण एकाचवेळी गायब झाले. त्यांना येण्यास उशीर झाला. तोपर्यंत देशप्रभू हे सिटी स्कॅन विभागात होते. त्यांचे सिटी-स्कॅन होण्यास सुमारे अर्धा तास विलंब झाला. या एकूण प्रकरणाची चौकशी रेडिओलॉजी विभागाच्या प्रमुखांनी केली, त्यामध्ये त्या २१ एप्रिल रोजी जे डॉक्टर्स तसेच टेक्निशियन ड्युटीवर होते त्यांच्याकडू स्पष्टीकरण घेतले आहे. देशप्रभू यांना सिटी स्कॅन करण्यासाठी आणण्यात आले, त्यावेळी कोणीही नव्हते हे मान्य केले आहे. या विभागाची जबाबदारी ड्युटीवर असलेल्या वरिष्ठ निवासी डॉक्टर्सची होती. त्यांच्या निष्काळजीपणामुळे देशप्रभू यांच्यावरील उपचारात विलंब झाला. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावून जीव गमावावा लागला, असा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यांच्या या मृत्यूला ड्युटीवरील डॉक्टरांचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचे रेडिओलॉजी विभागाच्या प्रमुखांनी सादर केलेल्या प्राथमिक अहवालात नमूद केले आहे.

वरिष्‍ठ डॉक्‍टरांना नोटिसा
देशप्रभू यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणीच्या सखोल चौकशीसाठी आरोग्य खात्याने ज्‍येष्ठ डॉ. जे. पी. तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती नेमली आहे. या समितीमध्ये मेडिसीन विभागाच्या डॉ. अनार खांडेपारकर तसेच डॉ. राजेश पाटील हे सदस्य आहेत. ज्या दिवशी देशप्रभू यांना आपत्कालिन कक्षात उपचारासाठी आणण्यात आले होते, त्यावेळी त्या ठिकाणी ड्युटीवर असलेल्या मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) यांच्यासह इतर वरिष्ठ व कनिष्ठ डॉक्टर्स तसेच परिचारिका यांना येत्या ११ मे २०२० रोजी सकाळी ११ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत चौकशीस हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

 

 

संबंधित बातम्या