माजी सभापती अनंत शेट यांचे देहावसान

तुकाराम सावंत
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

कुंभार समाजातील नेते, मयेचे माजी आमदार तथा माजी सभापती अनंत विष्णू शेट यांचे रविवारी पहाटे वयाच्या ५८व्या वर्षी अल्पशा आजाराने आकस्मिक निधन झाले. रक्‍तदाबाचा त्रास जाणवल्याने बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात त्यांना उपचारार्थ दाखल केले होते. तेथे उपचार चालू असताना रविवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

डिचोली

कुंभार समाजातील नेते, मयेचे माजी आमदार तथा माजी सभापती अनंत विष्णू शेट यांचे रविवारी पहाटे वयाच्या ५८व्या वर्षी अल्पशा आजाराने आकस्मिक निधन झाले. रक्‍तदाबाचा त्रास जाणवल्याने बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात त्यांना उपचारार्थ दाखल केले होते. तेथे उपचार चालू असताना रविवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अनंत शेट यांच्या निधनाची वार्ता कानी पडताच राजकीय नेत्यांसह त्यांचे चाहते आणि कार्यकर्ते मिळून शेकडो लोकांनी त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी कुंभारवाडा-मये येथील निवासस्थानी धाव घेतली. अनंत शेट यांच्यामागे पत्नी अनुराधा, पुत्र अमरीश, कन्या अक्षता, भाऊ कालिदास, दुर्गाराम आणि प्रेमेंद्र (मये पंचायतीचे विद्यमान पंच), भावजया, एक बहिण, पुतणे, पुतण्या असा मोठा परिवार आहे.

घसरून पडल्‍याचे झाले निमित्त...
मागील शनिवारी (ता. २५) अनंत शेट हे आपल्‍या मये येथील घरातील स्वच्छतागृहात घसरुन पडल्यानंतर त्यांच्यावर गोमेकॉत उपचार करून घरी आणण्यात आले होते. तेव्हापासून डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार ते घरात आराम घेत होते. शुक्रवारी रक्‍तदाबाचा त्रास जाणवल्याने त्यांना रात्रीच गोमेकॉत दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार चालू होते.

राजकीय प्रवास
माजी सभापती अनंत शेट हे २००७ आणि २०१२ साली झालेल्या सलग दोन विधानसभा निवडणुकीत मये मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर निवडून आले होते. २०१२ साली राज्यात भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांची विधानसभेचे उपसभापती म्हणून निवड झाली. तर जानेवारी २०१६ मध्ये ते विधानसभेचे सभापती बनले. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने अनंत शेट यांना उमेदवारी नाकारल्यानंतर तेव्हापासून काही काळ राजकारणापासून अलिप्त झालेले अनंत शेट हे गेल्या काही महिन्यांपासून राजकारणात पुन्हा सक्रिय झाले होते.

माजी सभापती अनंत शेट यांच्या निधनाने भाजपने आदर्श व अनुभवी नेता गमावला आहे. स्थानिक राजकारण, समाजकारणात त्यांचे फार मोठे योगदान आहे. वेळोवेळी त्यांनी पक्ष सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले आहे. लोकांची सेवा करणारा, साधी राहणी व संयमी नेता अशी त्यांची गोव्यात प्रतिमा होती. त्यांच्या या आकस्मिक निधानाने मोठी हानी झाली असून त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत.
डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

मये मतदारसंघातून दोनवेळा विधानसभेवर निवडून आलेले माजी सभापती अनंत शेट यांचा स्वभाव शांत, मनमिळाऊ होता. त्यांनी नेहमी लोकांना सेवा देण्यासाठी आपले आयुष्य घालविले. त्यामुळे त्यांची ही सेवा स्मरणात राहील. ते गोव्यामध्ये आदरणीय नेते म्हणून परिचित होते. ईश्‍वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो तसेच त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख पेलण्यास शक्ती देवो.
- सत्यपाल मलिक, राज्यपाल

----------------------------

संपादक - संजय घुग्रेटकर

संबंधित बातम्या