फेसबुकद्वारे गंडा घालणाऱ्या नायजेरियनास दिल्लीत अटक

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

फेसबुकवर मित्र बनून व विदेशातून मोठे गिफ्ट पाठवण्याचे आमिष दाखवून ५.१६ लाखांना गंडा घातलेल्या संशयित ओनुराह डोनाटस जिडेओफोर (२८ वर्षे) या नायजेरियन नागरिकाला गोवा पोलिसांनी दिल्लीत जाऊन अटक केली.

 पणजी : फेसबुकवर मित्र बनून व विदेशातून मोठे गिफ्ट पाठवण्याचे आमिष दाखवून ५.१६ लाखांना गंडा घातलेल्या संशयित ओनुराह डोनाटस जिडेओफोर (२८ वर्षे) या नायजेरियन नागरिकाला गोवा पोलिसांनी दिल्लीत जाऊन अटक केली. त्याने बनावट नावाने फेसबूकवर खाते उघडून पीडित तक्रारदारला फसविल्याने यासंदर्भातची तक्रार सायबर कक्षाकडे नोंद झाली होती. त्याचा प्राथमिक तपास करून संशयिताचा दिल्लीतील पोलिसांच्या मदतीने शोध घेण्यास यश मिळवले. 

गुन्हा अन्वेषण विभागाच्या क्राईम ब्रँचने दिलेल्या माहितीनुसार संशयित ओनुराह याने फेसबुकवर स्टीव्ह जोझ या नावाने खाते उघडले.
या फेसबुकवरून त्याची पीडितेशी मैत्री झाली. या मैत्रीतून त्याने पीडितेला विदेशातून गिफ्ट पाठविणार असल्याचे सांगितले. विदेशातून हे गिफ्ट पाठविले जाणार असल्याने केंद्रीय जकात शुल्कसाठी मैत्रिणीला बँकेच्या खात्यावर पैसे जमा करण्यास सांगितले. त्यानुसार ती पैसे जमा करत गेली मात्र गिफ्ट काही आले नाही. त्यामुळे तिने सायबर कक्षात तक्रार दिली 
होती. 

पोलिसांनी तक्रारदारने संशयिताकडून आलेल्या ईमेल तसेच फेसबुकची माहिती पोलिसांना सादर केली. या माहितीच्या आधारे गोवा पोलिसांनी केलेल्या चौकशीत फेसबुकवर संशयिताने उघडलेले खाते बनावट होते. तसेच त्याने पैसे जमा करण्यासाठी दिलेला खाते क्रमांकही वेगळ्याच नावाने होता. यावरून संशयिताने तक्रारदाराची फसवणूक केल्याचे उघड झाले. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सायबर कक्षाच्या तज्ज्ञांची मदत घेतली. या मदतीने संशयिताचा शोध लावला. संशयिताचे नाव ओनुराह डोनाटस जिडेओफोर असून तो दिल्लीतील मोहन गार्डन येथे राहत असल्याची माहिती मिळाली. क्राईम ब्रँचचे पथक दिल्लीला रवाना झाले व तेथील पोलिसांच्या आधारे संशयिताने गजाआड करण्यात यश मिळवले. पोलिस निरीक्षक फिलोमिना कोस्ता यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक नितीन हळर्णकर यानी दिल्लीत जाऊन ही कारवाई केली.

संबंधित बातम्या