जिल्हा पंचायत निवडणुकीचा निर्णय ‘कोरोना’ स्थितीवर अवलंबून

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

केंद्रीय निवडणूक आयोगाने बिहारमधील निवडणुकांना हिरवा कंदील दाखवल्यानंतर राज्यातील जिल्हा पंचायतीच्या निवडणुकांबाबतही हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने सरकारला या निवडणुका दिवाळीनंतर तसेच नाताळपूर्वी घेण्‍यासाठी तारीख सूचविण्याची सूचना केली आहे.

 पणजी : केंद्रीय निवडणूक आयोगाने बिहारमधील निवडणुकांना हिरवा कंदील दाखवल्यानंतर राज्यातील जिल्हा पंचायतीच्या निवडणुकांबाबतही हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने सरकारला या निवडणुका दिवाळीनंतर तसेच नाताळपूर्वी घेण्‍यासाठी तारीख सूचविण्याची सूचना केली आहे. त्यामुळे या निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, हे राज्यातील कोरोना महामारीच्या स्थिती व प्रमाण यावरही अवलंबून असेल, असे मत आयोगाच्या अधिकाऱ्याने व्यक्त केले. 

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ५० जिल्हा पंचायत मतदारसंघासाठीची पूर्ण तयारी केलेली आहे. मात्र, ४८ मतदारसंघासाठी ही निवडणूक होणार आहे. सांकवाळ मतदारसंघातून एकाच उमेदवाराचा अर्ज आल्याने तसेच नावेली मतदारसंघात उमेदवारांपैकी एकाचा मृत्यू झाल्याने या दोन्ही मतदारसंघामध्ये निवडणूक घेतली जाणार नाही. निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया झाली असल्‍याने आयोगाकडून उमेदवारांना प्रचारासाठी मतदानाची तारीख निश्‍चित झाल्यानंतर अधिकाधिक पाच दिवसांपेक्षा अधिक वेळ दिला जाणार नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक घेण्यास परवानगी दिल्याने राज्य निवडणूक आयुक्त आर. के. श्रीवास्तव यांनी मुख्यमंत्री तसेच मुख्य सचिवांशी भेटून जिल्हा पंचायत निवडणूक संदर्भात चर्चा केली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून ही निवडणूक घेण्यास हरकत नाही. राज्य आयोगातर्फे पूर्ण तयारी आहे, असे संकेत दिले होते. 

केंद्रीय निवडणूक आयोगाने कोरोना महामारीसाठी नमूद केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून निवडणुकीस परवानगी दिली आहे. त्यासाठी सुरक्षित अंतर, मास्क वापरणे व स्वच्छता यावर प्रामुख्याने सक्ती केली आहे. इतर राज्यातील निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर जिल्हा पंचायत निवडणूक घेण्यासाठीची फाईल सरकारला नोव्हेंबरच्या मध्यान्ह पाठविली जाण्याची शक्यता आहे.

 
राज्यातील जिल्हा पंचायतीचा कार्यकाळ २३ मार्च २०२० रोजी संपला आहे व सध्या दोन्ही जिल्हा पंचायतींवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. या निवडणुका १५ मार्च २०२० रोजी होणार होत्या. त्यासाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही प्रचारही सुरू झाला होता. मात्र, या तारखेलाच शिगमोत्सव असल्याने ही निवडणूक २२ मार्च २०२० पर्यंत पुढे ढकलण्यात आली. केंद्र सरकारने देशामध्ये जनता कर्फ्यू लागू केल्याने ही तारीख २४ मार्च करण्यात आली होती. मात्र, गोव्यातही महामारीचा प्रभाव वाढण्याची शक्यता असल्याने ही निवडणूकच स्थगित ठेवण्यात आली. जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी एकूण ३४५ उमेदवार रिंगणात आहेत व ही निवडणूक पक्ष पातळीवर लढविली जाणार आहे.

संबंधित बातम्या