यंदाचा वास्को सप्ताह पारंपरिक पद्धतीने साजरा न करण्याचा निर्णय

Shri Damodar
Shri Damodar

मुरगाव
वास्को शहर परिसरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पसरला आहे. याची गंभीर दखल घेऊन येत्या २६ जुलै रोजी वास्कोत साजरा करण्यात येणारा १२२ वा श्री दामोदर भजनी सप्ताह नेहमीच्या पारंपरिक पद्धतीने साजरा न करण्याचा एकमुखी निर्णय उत्सव समितीने घेतला आहे. फक्त पारंपरिक पद्धतीने ता. २६ जुलै रोजी दुपारी १२ वाजता जोशी कुटुंबियांतर्फे श्रीचरणी श्रीफळ अर्पण केल्यानंतर अवघ्या चार ते पाच भजनी कलाकारांच्या साथीने विठू नामाचा गजर घालून सप्ताहास प्रारंभ करण्यात येणार आहे. भजनी पथकांची अखंड चोवीस तास भजने होणार नाहीत. दुसऱ्या दिवशी ता. २७ रोजी गोपालकाल्याने उत्सवाची समाप्ती केली जाणार आहे, पण त्यासाठी समुद्रात श्रीफळ विसर्जीत करण्यासाठी बालगोपाळांची दिंडी मिरवणूक निघणार नाही. एका वाहनांतून अवघे चार भाविक समुद्राकडे जाऊन श्रीफळ विसर्जीत करणार आहेत, असे श्री. जोशी यांनी सांगितले.
मंदिराच्या बाहेर मंडप घालण्यात येणार नाही. फुल विक्रेत्यांना बंदी घालण्यात येईल, तसेच जोशी कुटुंब आणि उत्सव समितीच्या अध्यक्षांविना कोणालाच देवदर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही असे श्री. जोशी यांनी स्पष्ट करून या काळात मंदिर आणि सभोवतालचा परिसर मुरगाव उपजिल्हाधिकारी आणि पोलिसांच्या नियंत्रणाखाली ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले.
वास्को सप्ताहाच्या आदल्या दिवशी नागपंचमीला कुठलाही उत्सव साजरा करण्यात येणार नाही. तसेच या दिवशी जोशी कुटुंबियांतर्फे करण्यात येणारा महारुद्र अनुष्ठान हा धार्मिक विधी कशा पद्धतीने साजरा करावा हा निर्णय जोशी कुटुबाने घ्यावा, असे उत्सव समितीने स्पष्ट केले आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वास्को सप्ताह उत्सव समितीने यंदा पारंपरिक भजनी सप्ताह साजरा करण्याच्या सर्वप्रकारच्या कार्यक्रमांना फाटा दिला आहे. सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांची पायमल्ली होऊ नये, कोरोनाचा संसर्ग पसरू नये याची काळजी घेत उत्सव समितीने सप्ताह साजरा न करण्याचा निर्णय घेतल्याचे श्री. जोशी यांनी सांगितले.
दरम्यान, यंदा भक्तांकडून वर्गणी गोळा केली जाणार नाही. तथापि, ज्या भक्तांना आपली वार्षिक वर्गणी द्यायची असेल, त्यांनी थेट देवस्थानच्या बॅंक खात्यात ती जमा करावी, असे श्री. जोशी यांनी आवाहन करून भक्तगणांनी सप्ताह काळात देवदर्शनाला उपस्थिती लाऊ नये अशी विनंती केली.
वास्को सप्ताह उत्सवातील पार मिरवणूक, संगीत मैफली होणार नाही. विविध चीजवस्तूंची दुकानेही थाटण्यात येणार नाही तशी कल्पना उपजिल्हाधिकारी आणि मुरगाव पालिकेला देण्यात येणार आहे, असे श्री. जोशी यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले. या पत्रकार परिषदेस उत्सव समितीचे अध्यक्ष जगदीश दुर्भाटकर, सचिव संतोष खोर्जुवेकर, उपाध्यक्ष कृष्णा सोनुर्लेकर, कार्यकारी समितीचे सचिव विनायक घोंगे आदी उपस्थित होते.

 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com