कोविड महामारीमुळे पासपोर्ट अर्जांत घट; एप्रिल व मे महिन्यात फक्त ५२३ अर्ज

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

यावर्षीच्या जानेवारीस जेव्हा कोरोना नव्हता तेव्हा पासपोर्ट कार्यालयाकडे ४२४२ अर्ज आले होते. मात्र त्यानंतर या अर्जांमध्ये गळती सुरू झाली. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये ३५५२ अर्ज आले तर मार्चमध्ये २२८९ अर्ज ऑनलाईनद्वारे आले होते.

पणजी: कोविड महामारीचा फटका राज्यातील सर्व क्षेत्रात बसला आहे. गोव्यातील पासपोर्ट कार्यालयात पासपोर्ट करणाऱ्यासाठी दरदिवशी नेहमीच गर्दी असायची मात्र या कोविड काळात ही स्थिती खूपच नगण्य होती. पासपोर्ट प्रक्रिया ऑनलाईनद्वारे करण्यात येत असली तरी त्यालाही या काळात मोठासा प्रतिसाद लाभलेला नाही. टाळेबंदीच्या काळात एप्रिल व मे महिन्यात ५२३ अर्ज पासपोर्टसाठी आले. अनेकांनी या महामारीमुळे अर्ज करण्याकडे पाठ केली. 

एरव्ही पासपोर्ट कार्यालयात दर महिन्याला किमान पाच हजारापेक्षा अधिक ऑनलाईनने अर्ज येतात. दरदिवशी सरासरी दोनशेच्या आसपास अर्ज या कार्यालयाला हाताळावे लागतात. त्यामध्ये नवीन तसेच नूतनीकरण पासपोर्ट या अर्जाचाही समावेश असतो. पासपोर्ट कार्यालयात आलेले अर्ज त्याच दिवशी अर्जदाराची माहिती संगणकावरून पोलिस खात्याला पाठविली जाते. त्यामुळे ऑनलाईनद्वारे लोकांना त्वरित सेवा मिळण्यास सोय झाली आहे. यावर्षीच्या जानेवारीस जेव्हा कोरोना नव्हता तेव्हा पासपोर्ट कार्यालयाकडे ४२४२ अर्ज आले होते. मात्र त्यानंतर या अर्जांमध्ये गळती सुरू झाली. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये ३५५२ अर्ज आले तर मार्चमध्ये २२८९ अर्ज ऑनलाईनद्वारे आले होते. मात्र राज्यात मार्च महिन्याच्या अखेरीस टाळेबंदी सुरू झाल्यानंतर त्याचा परिणाम या पासपोर्ट कार्यालयाकडे येणाऱ्या अर्जावरही झाला. टाळेबंदीच्या काळात हे कार्यालयात काही दिवस बंदही ठेवण्यात आले होते. त्यामुळे एप्रिल महिन्यात फक्त ४ अर्ज आले. टाळेबंदीमुळे या कार्यालयात मुलाखतीसाठी जाणे शक्य नसल्याने अनेकांनी नवीन पासपोर्टसाठी ऑनलाईनद्वारे अर्ज करणे टाळले. ज्यांच्या पासपोर्टची मुदत संपली होती त्याचे नूतनीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने मुभा दिल्याने त्यांनीही नुतनीकरणास अर्ज केले नाही अशी माहिती पासपोर्ट कार्यालयातील अधिकाऱ्याने दिली. 

नवीन पासपोर्ट करण्यासाठी तसेच पासपोर्ट नूतनीकरणासाठी आता ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाल्याने पासपोर्ट झटपट मिळण्याची सोय झाली आहे. पासपोर्ट कार्यालयातून अर्जदाराने दिलेली माहिती पडताळून पाहण्यासाठी ती पोलिस खात्याच्या पासपोर्ट पडताळणी विभागाकडे त्या भागातील पोलिस स्थानकात पाठविली जाते. त्याची पडताळणी त्वरित करून त्याचा अहवाल पासपोर्ट कार्यालयाकडे पाठविला जातो. अर्जदाराने जो पत्ता दिलेला आहे तेथे जाऊन पोलिस त्याची चौकशी करतात. ती व्यक्ती नमूद केलेल्या पत्त्यावर न सापडल्यास तसा अहवाल पाठविला जातो. या ऑनलाईन पद्धतीमुळे पासपोर्ट कार्यालय तसेच पोलिस विभागातील प्रक्रिया सुटसुटीत तसेच झटपट होत आहे, पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. 

कोविड - १९ पार्श्‍वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमान सेवाही बंद आहे. परदेशात नातेवाईकांकडे वा कामानिमित्ताने जाण्यासाठी पासपोर्ट अर्ज करणाऱ्यांची संख्या कमी झाली होती ती आता जून महिन्यापासून हळूहळू वाढू लागली आहे. एप्रिलमध्ये ४ अर्ज आले होते त्यात काहीशी वाढ होऊन मे महिन्यात ५१९ अर्ज आले. सरकारने ‘एसओपी’मध्ये सवलती दिल्याने आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा सुरू होईल या अंदाजाने पुन्हा अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या