१०० कोटी रुपयांचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय - दीपक पाऊसकर

१०० कोटी रुपयांचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय - दीपक पाऊसकर
Deepak-Pauskar

सासष्टी  - साळावली येथे १०० एमएलडी पाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी १०० कोटी रुपये खर्च करावे लागणार असून हा प्रकल्प जलजीवन अभियान या राष्ट्रीय योजना, अन्यथा जायका अंतर्गत उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. जलजीवन अभियानांतर्गत हा प्रकल्प उभारल्यास केंद्र सरकारला ५० कोटी, तर राज्य सरकारला ५० कोटी रुपये खर्च करावे लागणार आहे. पण, ‘जायका''ने निधी पुरविल्यास ‘जायका’ अंर्तगत हा प्रकल्प उभारण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनी दिली. 

साळावली येथे जायका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे असलेल्या पाणी प्रक्रिया प्रकल्पातून २६० एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येत असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर ३६० ‘एमएलडी’ पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. पुढील २० वर्षाला केंद्रस्थानी ठेवून हा १०० कोटी रुपयांचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दक्षिण गोव्याबरोबर उत्तर गोव्यातील काही भागात या प्रकल्पाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येईल. १०० एमएलडी पाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी जागाही निश्चित करण्यात आलेली असून वन विभागाच्या जागेत हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्‍यामुळे वन विभागाकडून प्रकल्‍पासाठी मान्यता मिळविण्यात आलेली आहे, असे मंत्री पाऊसकर यांनी  सांगितले. 

कुर्डी खांडेपार ते ओपा पाणीप्रक्रिया प्रकल्पासाठी ७०० एमएम व्‍यासाची नवीन जलवाहिनी टाकण्याचा कामाला सुरवात करण्यात आली होती. पण, कोरोना महामारीमुळे जलवाहिनी बदलण्याच्या काम बंद करण्यात आले होते. ही वहिनी जुनाट झाल्यामुळे अनेक ठिकाणी जलवाहिनी फुटण्याच्‍या घटना घडत होत्या. त्यामुळे सुमारे २.८ कोटी रुपये खर्च करून नवीन जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण, ज्या कंत्राटदाराला हे काम सोपविण्यात आलेले आहे, तो गुजरातमधील असल्यामुळे कोरोनाचा काळात वाहिनी बदलण्याचे काम सुरू करणे कठीण बनलेले आहे. पण, आता जलवाहिनी टाकण्याचा कामास सुरवात झाली आहे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनी सांगितले. 

पुढील वीस वर्षांचे नियोजन
गोव्यात वाढणाऱ्या लोकसंख्येला केंद्रस्थानी ठेवून पुढील २० वर्षांचे योग्यरीत्या नियोजन करून हा प्रकल्प उभाण्यात येत आहे. केंद्र सरकारचा जलजीवन अभियान तसेच जायका अंतर्गत हा प्रकल्प उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. हा प्रकल्पातील पाणी दक्षिण गोव्याबरोबर उत्तर गोव्यातील सांतआंद्रे, पणजी व अन्य ठिकाणी पाणी पुरविण्यात येणार आहे, असे पाऊस्‍कर यांनी सांगितले. साळावली येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे चार सीएनएफ फिल्टर टॅंक असून एका टॅंकमधून ४० एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यातील सध्या तीन फिल्टर टॅंक चालू स्थितीत असून बिघड झालेल्या अन्य एक फिल्टर टॅंकचे दुरुस्तीकाम हाती घेण्यात येणार आहे. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com