गाळे बांधकामाच्या विलंबामुळे हातगाडी धारक आक्रमक!

मुख्यमंत्र्यांनी आश्‍वासनपूर्ती करावी : गोमेकॉ इस्पितळबाहेर सोमवारपासून हातगाडी धारक पुन्हा साखळी उपोषण करणार.
गाळे बांधकामाच्या विलंबामुळे हातगाडी धारक आक्रमक!
हातगाडीDainik Gomantak

गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाच्या बाहेरील क्षेत्रातील फळ-भाजी विक्रेते तसेच भाडेधारकांना पर्यायी व्यवस्था करण्याचे दिलेले आश्‍वासन सरकारने न पाळल्याने येत्या सोमवारपासून पुन्हा या इस्पितळाच्या बाहेर साखळी उपोषण सुरू करण्याचा निर्णय आज हातगाडी धारकांनी घेतला. जोपर्यंत गाळे बांधकाम सुरू होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असल्याची माहिती गाडेधारकांनी दिली.

या इस्पितळाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या फळे-भाजी विक्रेत्यांना तसेच गाडेधारकांना हटविले होते. त्यावेळी स्थानिक आमदार टोनी फर्नांडिस तसेच आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनी या गाडेधारकांना पाठिंबा देत त्यांची पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी सरकारकडे केली होती. सरकारनेही त्यावर तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले होते. दरम्यान हे आश्‍वासन पूर्ण होत नसल्याने गाडेधारकांनी धरणे आंदोलन सुरू केले होते.

हातगाडी
गोव्यातील हिंदू जनजागृती समिती कॉमेडियन मुनावर फारुकी च्या विरोधात

सहा दिवसांनंतर आमदार टोनी फर्नांडिस यांनी गाळे बांधकाम १० नोव्हेंबरपर्यंत सुरू होऊन १९ डिसेंबरपर्यंत या गाळ्यांचा ताबा दिला जाईल असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांच्यावतीने दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले होते. मात्र १० नोव्हेंबर उलटून गेला तरी त्या ठिकाणी गाळे बांधकामाचे काहीच काम सुरू झाले नाही. त्यामुळे निवडणूकपूर्वी हे काम सुरू न झाल्यास पुढील सरकार येईपर्यंत वाट पाहावी लागेल व आतापर्यंत केलेल्या प्रयत्न फुकट जातील यामुळे गाडेधारक पुन्हा आक्रमक झाले आहेत व त्यांनी हे आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती डॉम्निक परेरा यांनी दिली.

आंदोलनासाठी आमदारांना विनंती करणार : परेरा

इस्पितळाच्या बाहेरील क्षेत्रातील ठिकाणी फळे-भाजी विक्रेते तसेच गाडेधारक मिळून एकूण ७२ जणांना जागा देण्याचा निर्णय झाला आहे. त्यासंदर्भातचा आराखडा तयार झालेला आहे तर बांधकाम सुरू होण्यास का उशीर होत आहे याचा जाब विचारण्यासाठी सहाय्यक अभियंत्यांना आज गाडेधारक गेले होते. अभियंता बैठकीत व्यस्त असल्याने ते भेटू शकले नाहीत. स्थानिक आमदार टोनी फर्नांडिस यांनी गाडेधारकांची मागणी पूर्ण होण्यास उशीर झाल्यास आपणही त्यांच्यासोबत आंदोलनात सामील होऊ असे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे आमदारांना त्यांच्यासोबत आंदोलनात सामील होण्याची विनंती केली जाणार आहे, असे परेरा यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com