'राज्यात 'आप'ची सत्ता आल्यावर ‘दिल्ली वीज मॉडेल’ आणू'

गोमंतक ऑनलाईन टीम
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

दिल्लीतील आप सरकार व गोव्यातील भाजप सरकार यांच्यातील वीज मॉडेलसंदर्भात चर्चा करण्यास वीजमंत्री निलेश काब्राल यांनी आव्हान दिले होते ते स्वीकारून मी गोव्यात आलो आहे, असे आपचे दिल्लीचे आमदार राघव चढ्ढा यांनी म्हटले आहे.

पणजी - आगामी विधानसभा निवडणुकीत गोव्यात आम आदमी पक्ष (आप) सत्तेवर येताच ४८ तासांमध्ये २०० युनिटपर्यंत वीज बिल येणाऱ्या ग्राहकांना वीज मोफत दिली जाईल तर २०० ते ४०० युनिटपर्यंत वीज बिल येणाऱ्या ग्राहकांना बिलामध्ये ५० टक्के सूट दिली जाईल, अशी घोषणा आपचे दिल्लीचे आमदार राघव चढ्ढा यांनी केली. दिल्लीतील आप सरकार व गोव्यातील भाजप सरकार यांच्यातील वीज मॉडेलसंदर्भात चर्चा करण्यास वीजमंत्री निलेश काब्राल यांनी आव्हान दिले होते ते स्वीकारून मी गोव्यात आलो आहे. शिष्टाचाराचे कारण पुढे करून त्यांनी या चर्चेपासून पळवाट काढू नये. जर दिल्लीतील आप सरकारला वीज बिलामध्ये ग्राहकांना सूट देणे शक्य आहे तर राज्यातील भाजप सरकारला का नाही, असा सवाल त्यांनी आज पणजीत ‘आप’च्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. या परिषदेत त्यांनी थेट वीजमंत्री निलेश काब्राल यांना मोबाईलवरून फोन लावला. मात्र, त्यांचा फोन बंद होता. वीजमंत्री निलेश काब्राल हे जसे भाजपचे लोकप्रतिनिधी व आमदार आहेत तसा मी सुद्धा आपचा लोकप्रतिनिधी व आमदार आहे. त्यामुळे शिष्टाचाराच्या नावाखाली त्यांनी आडमुठेपणाचे धोरण स्वीकारून चर्चा टाळू नये. त्यांनी दिलेल्या आव्हानानुसार मी गोव्यात आलो आहे. तेव्हा त्यांनी मी चर्चा करण्यास कोठे व किती वाजता येऊ हे कळवावे, असे आव्हान वीजमंत्र्यांना त्यांनी दिले.

संबंधित बातम्या