संजीवनी सहकारी साखर कारखाना बंद न करण्याची मागणी

संजीवनी सहकारी साखर कारखाना बंद न करण्याची मागणी
संजीवनी सहकारी साखर कारखाना बंद न करण्याची मागणी

वाळपई: संजीवनी साखर कारखाना बंद असल्याने तो भविष्यात पुन्हा सुरू होईल ही शक्यता कमीच आहे. त्यामुळे सत्तरीतील ऊस शेतकरी बांधवांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. सध्या असलेला संजीवनी सहकारी कारखाना सुरू ठेवावा किंवा त्याची दुरुस्ती करून सुरू करावा, पण बंद करू नये, अशी मागणी सत्तरीतील ऊस उत्पादक शेतकरी करीत आहेत. 

एखादा शेती व्यवसाय करायचा म्हटला की त्या मालाला योग्य ती बाजारपेठ मिळणे आवश्यक असते. त्या मालाला योग्य भाव योग्य वेळेत मिळाला, तरच कोणताही व्यक्ती शेती करण्यास तयार असतो. केवळ जमिनीत शेती माल फुलवून चालणार नाही, तर त्या मालाला योग्य भाव, मार्गदर्शन करणारे अधिकारी, साधनसुविधा योग्य त्या पुरविणे या गोष्टींचा अंतर्भाव असल्यास शेती पीक वाढविण्यास प्रोत्साहन मिळत असते. 

सत्तरी तालुक्यात आजही ऊस लागवड करणारे शेतकरी बांधव आहेत, पण सध्या संजीवनीबाबत चाललेल्या गोंधळामुळे ऊस शेतकरी बांधव चिंतेत आहेत. त्यातच वन्य प्राण्यांचे वाढते आक्रमणही आहेच. शेतात परिश्रमपूर्वक उभ्या केलेल्या ऊस पिकाचे रानडुक्करसारखे प्राणी नुकसान कतात. त्यामुळे वन्य प्राण्यांपुढेही शेतकरी हतबल झाले आहेत. सत्तरी तालुक्यात खोडये, वांते, बांबर, कोदाळ अशा काही गावात आज ऊस शेती केली जाते. सत्तरीत काजू, सुपारी मोठ्या प्रमाणावर होते. त्या मागून भात शेती देखील कमी झाली आहे. त्या खालोखाल ऊस शेतकरी बांधवांनी ऊस लागवड कशीबशी तग धरून ठेवली आहे, पण येणाऱ्या काळात जर या शेतकरी बांधवांना योग्य तो वेळेत दर,  साधनसुविधा वेळेत पुरविल्या गेल्या नाहीत, तर हळूहळू ऊस शेती करणे बंद  होणार असल्याचा धोका संभवत आहे. ऊस हे नगदी पीक आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पडिक शेतजमिनी पुन्हा बहरायच्या असतील, तर ऊस दर वेळेत शेतकरी बांधवांना मिळाला पाहिजे. काही शेतकऱ्यांनी आधुनिक यंत्रणेचा वापर करून ऊस लागवड केली आहे. त्यासाठी अतिशय मेहनत घेतलेली आहे. ऊस पिकाला ठिबक सिंचन पध्दतीने पाणी देण्याची सोय केली आहे. 

आजच्या घडीला ऊस लागवड करणे कठीण बनले आहे. त्यामुळे नवीन शेतकरी तयार होताना दिसत नाही. जे पुर्वापारपणे ऊस लागवड करीत आले आहेत. तेच तग धरून आहेत. आपण कोल्हापूर येथून आणलेल्या शरद या ऊस जातीची लागवड करीत आहे. बारा महिन्यात हा ऊस तयार होतो व ऊसला चांगले वजनही मिळते. पण समस्या आहे ती ऊसाला वेळेत दर मिळणार याची शाश्वती कधीच नाही. संजीवनी कारखाना बंद असून रडत मरत चालला आहे. आजपर्यंत अशी वस्तुस्थिती बनली की मुख्यमंत्र्यांचे पाय धरले तरच दखल घेतली जाते. गेली बारा वर्षे हेच चालून आले आहे. म्हणजेच शेतकरी बांधवाला स्वत:च्या कष्टाच्या मेहनतीचा मोबदला मिळण्यासाठी सरकार दरबारी नाचावे लागते ही शोकांतिका आहे, अशी खंत यासंदर्भात खोडये येथील ऊस उत्पादक कृष्णप्रसाद गाडगीळ यांनी व्यक्त केली.

कारखाना ऊस तोडत नाही. आम्हालाच कामगार बाहेरून आणून ऊस तोडावा लागतो. सध्या तीन हजार सहाशे असा दर ठरलेला आहे. त्यात बाराशे रुपये कारखाना देणार, अठराशे रुपये सरकार देणार व तोडणीसाठी मदत म्हणून सहाशे रुपये सरकार देणार असा दर आहे. पूर्वी दोनशे रुपये तोडणीला दर दिला जायचा, पण आता मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी त्यात चारशे रुपयांची वाढ करून सहाशे केला, पण ऊस तोडणीचा दर मात्र हातात दिलेला नाही. मागील एक वर्ष ऊस परराज्यात पाठविण्यात आला आहे. आता नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तोडणी होणार आहे, पण कारखाना बंद आहे. या समस्येमुळे आपण ऊस लागवड दहा एकरातून पाच एकरावर आणली आहे. जर सरकारला कारखाना कायमचा बंद ठेवायचा असेल, तर सरकारने पुढील दहा वर्षांची नुकसान भरपाई दिली पाहिजे. त्यासाठी सर्वे करून एकरी तीस टन उत्पादन याप्रमाणे नुकसान भरपाई पुढील दहा वर्षांची दिली पाहिजे. तरच शेतकरी नवीन पर्यायी पीक निवडणार आहे. तसेच पर्यायी पीक कोणते निवडावे हे देखील कठीण आहे, असेही त्यांनी सांगितले.

अडवई येथील रोहीदास तुकाराम नाईक, वांते येथील संजय पिळयेकर, कोदाळ येथे राम झिप्रो ओझरेकर, संतोष गावकर, हरिश्चंद्र पालकर, उदय ओझरेकर, गुरुदास बांदेकर आदीजण ऊस लागवड करीत आहेत. संजीवनी बंद झाल्यास या सर्व शेतकऱ्यांपुढे मोठी समस्या निर्माण होणार आहे. 

बाविसशे टन क्षमतेचा कारखाना कसा चालणार? 
संजीवनी साखर कारखान्यात दर दिवशी बाराशे टन ऊस प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. मंत्री गोविंद गावडे यांनी संजीवनी बंद पडला, तर केंद्राच्या मदतीने नवीन कारखाना उभारू असे म्हटले होते, पण त्यासाठी केंद्राच्या नियमानुसार निदान बाविसशे टन प्रक्रियेचा कारखाना बांधावा लागणार आहे. आधीच बाराशे टन क्षमतेचा कारखाना चालविण्यात सरकारला नाकेनऊ येतात, मग बाविसशे टन क्षमतेचा कारखाना कसा चालविणार हा प्रश्नच आहे अशी विचारणा सत्तरीतील ऊस शेतकरी करीत आहेत.

खोडये येथील कृष्णप्रसाद गाडगीळ म्हणाले, आपण २००९ साली ऊस पीक लागवडीत पहिल्यांदा ठिबक सिंचनाचा वापर केला. २०१३ साली त्यात सुधारणा करीत भुपृष्ठ अंतर्गत (सबसर्फेस) ठिबक सिंचन यंत्रणा बसविली होती. तसेच संगणकाच्या जोडीने पाणी व खत व्यवस्थापन केले आहे. पावसाळा संपला की ऊस पिकाला पाणी व्यवस्थापन करावे लागते. डिसेंबरमध्ये ऊस तोडायचा झाला की कामगारांना आधीच चतुर्थीत काही आर्थिक मोबदला द्यावा लागतो. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी अत्यंत दूरदृष्टी ठेवून शेतकरी बांधवांचे हित लक्षात घेऊन साखर कारखाना कार्यान्वित केला होता. त्यातून येथील जनतेची आर्थिक रहाणीमान सुधारून सर्वजण सुखी होतील असा त्यांचा उद्देस होता, तो सफल होत असतानाच संजीवनी सहकारी साखर कारखाना बंद केला जात आहे. ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. - कृष्णप्रसाद गाडगीळ, खोडये

गेली बारा वर्षे मी माळोली गावातील जमिनीत ऊस लागवड करीत आहे. २००८ साली ठिबक सिंचनाने लागवड केली होती व पहिली दोन वर्षे १२० टन उत्पादन मिळाले होते, पण नंतर घटत जाऊन ७० टनावर आले आहे. ठिबक सिंचनाने पाण्याची बचत होत आहे. आता ऊसाला दर वेळेत देत नसल्याने उत्पादन क्षेत्र पाच एकरावरून तीन एकर केले आहे. आधी ऊस कांडी पध्दतीने लागवड केल्यानंतर चांगले उत्पादन मिळत होते, पण कारखान्याकडून एक काडी पध्दत अंमलात आणली. त्यामुळे ऊस पातळ होऊन उत्पादन घटले आहे. तसेच माळोली, कोदाळ या गावातील अनेक शेतकरी ऊस पीक घेतात. पण कारखाना बंद झाल्याने अनंत अडचणी निर्माण झालेल्या आहेत. खानापूरला ऊस नेतेवेळी ट्रकांमागे प्रवेश दर आकारला जातो. त्यामुळे हे शेतकऱ्याना नुकसानीचे आहे. भविष्यात सत्तरी तालुक्यात डोलणारा ऊस पहायचा असेल तर सरकारने कारभार चोखपणे चालविण्याची आवश्यकता आहे.- सुनिल मराठे, बांबर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com