मत्स्यखवय्यांची मासळी बाजाराकडे पाठ

प्रतिनिधी
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020

डिचोलीत मासळीला अपेक्षेप्रमाणे मागणी नाही : आज गर्दी होणार

डिचोली: पाच दिवसांच्या गणपती विसर्जनाने बहुतेक भागातील घराघरातील चतुर्थी साजरी झाली असली, तरी आज गुरुवारी डिचोलीत अपेक्षेप्रमाणे मासळीला मागणी नव्हती. डिचोलीतील मासळी मार्केटात तर आज मोजकेच विक्रेते मासळी विक्री करीत होते. तर मत्स्यप्रेमी ग्राहकही अभावानेच बाजारात दिसून येत होते. गुरुवार दिवस असल्याने, की काल बाजारात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने भीतीने मत्स्यप्रेमी खवय्यांनी मासळी मार्केटकडे पाठ केली, ते मात्र समजू शकले नाही. मात्र, डिचोलीत आज मासळी खरेदीला हवा तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. 

श्रावण महिना ते चतुर्थी साजरी होईपर्यंत जवळपास सव्वा महिनाभर ‘शिवराक’ पाळलेल्या मत्स्यप्रेमी खवय्यांची पावले आज मासळी बाजारात वळणार. अशी अपेक्षा होती. पाच दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर आज गुरुवारी डिचोली मासळी बाजारात मासे खरेदीसाठी खवय्यांची गर्दी उसळणार. अशी अपेक्षा होती. मात्र, तसे चित्र आज पाहायला मिळाले नाही. कारापूर-तिस्क येथे तर तात्पुरत्या मार्केटात तर नियमित मासेविक्रेते फिरकलेच नाही.त्यामुळेच हे मार्केट सकाळी ओस पडल्याचे दिसून येत होते.  

बाजारात अकराच विक्रेते
डिचोली मासळी बाजारात आज डिचोलीत मासळीची आवक कमी होती. महिला मिळून आज केवळ अकराच विक्रेते बाजारात मासळी विकताना दिसून येत होते. या विक्रेत्यांकडे बांगडे, कोळंबी, पापलेट आदी ठराविक मासळी विक्रीसाठी होती. अपेक्षेप्रमाणे मासळीला गिऱ्हाईक नव्हते. तरीदेखील मासळी महाग होती. बांगडे आकारानुसार दोनशे रुपयांना ३ ते ५ नग, बांगडुले शंभर रुपयांना सहा याप्रमाणे विकण्यात येत होती. कोळंबी ५०० रु. वाटा याप्रमाणे विकण्यात येत होती.

संबंधित बातम्या