सनद वाटप प्रक्रिया वेगवान करण्याची मये भूविमोचन नागरिक कृती समितीची मागणी

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 15 ऑगस्ट 2020

मयेकर पुढे म्हणाले, की ग्रामस्थांना जमिनीच्या मालकी हक्क नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या स्वावलंबी आणि इतर योजनांचा कोणताही फायदा स्थानिकांना घेता येत नाही.

मये: मये स्थलांतरीत मालमत्तेचा कायदेशीर हक्क मयेवासीयांना त्वरित मिळावी यासाठी सनद वाटप करण्याची प्रक्रिया वेगवान करण्याची मागणी मये भूविमोचन नागरिक कृती समितीचे अध्यक्ष काशिनाथ मयेकर आणि इतर सदस्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

 

मये भूविमोचन नागरिक कृती समितीच्या सदस्यांची एक बैठक नुकतीच झाली. यावेळी समितीचे अध्यक्ष काशिनाथ मयेकर यांनी सांगितले की, स्थानिकांना घरांचा मालकी हक्क मिळावा यासाठी माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी २०१४ साली ‘मालकी हक्क व जमीन अधिनियम २०१४’ नामक नवीन कायदा तयार केला होता. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात मालकी हक्कासाठी सुमारे १५०० रहिवाशांनी अर्ज दाखल केले होते, परंतु खेदाची गोष्ट म्हणजे आजतागायत १५०० रहिवाशांपैकी केवळ ३०० जणांना ‘ब’ दर्जाच्या सनदीचे वाटप करण्यात आले असून १२०० रहिवाशांना सनदांचे वाटप करण्याचे काम अजूनही बाकी आहे. त्यामुळे ही प्रकिया लवकरात लवकर अंमलात आणावी अशी मागणी सदस्यांनी केली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ‘ब’ दर्जाच्या सनदीचा रहिवाशांना विशेष लाभ नसल्याचे सदस्यांनी सांगितले.

 

मयेकर पुढे म्हणाले, की ग्रामस्थांना जमिनीच्या मालकी हक्क नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या स्वावलंबी आणि इतर योजनांचा कोणताही फायदा स्थानिकांना घेता येत नाही.

 

सखाराम पेडणेकर यांनी सांगितले, की कोविड - १९ या जागतिक आपत्तीमुळे सध्याच्या परिस्थितीत लोकांचे जगण्याचे साधन हरवले आहे आणि यामुळे गोरगरीबांना याचा तीव्र फटका बसला आहे. त्यांना  आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे, परंतु त्यांना मालकी हक्क नसल्याने ते उत्पन्नाचा स्रोत म्हणून शेती, वृक्षारोपण आणि इतर शेतीमालाचे उत्पादनही करू शकत नाहीत. त्यांची इच्छा असूनही अद्यापपर्यंत कोणतीही प्रक्रिया योग्य प्रकारे स्थानिकांना कार्यांन्वित करता आलेली नाही.

 

यशवंत करभटकर यांनी सांगितले की, सध्या लोक गंभीर परिस्थितीत वावरत असून लोकांना संबंधित सरकारी कामकाज करण्यास व इतर कोणतीही कामे करण्यास ना हरकत दाखला देऊ नये, अशी नोटीस सध्या मये ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर लावली असल्याने याचा बराच मनस्ताप रहिवाशांना होत आहे.

 

ॲड. शशिकांत परब गावकर, विनायक लामगावकर, हरिश्चंद्र च्यारी, आनंद वळवईकर आणि दिवंगत आनंद घाडी या आंदोलनकर्त्यांचा या चळवळीत महत्वाचा पुढाकार असल्याचे मयेकर यांनी सांगितले.  यासंदर्भात स्थानिकांना पाठबळ देण्यासाठी आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांची भूमिका देखील महत्त्वपूर्ण असल्याचेही त्यांनी नमूद केले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या