वास्को परिसर सील करण्याची मागणी

dainik gomantak
गुरुवार, 4 जून 2020

मुरगाव पालिकेतील नगरसेविका लविना डिसोझा तसेच नगरसेवक क्रितेश गावकर यांनीसुद्धा वास्को सील करावे, अशी भूमिका मांडली आहे.

मुरगाव,

मांगोरहिलमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने हा संसर्ग इतरत्र पसरवू नये, यासाठी वास्को परिसर पूर्णपणे सील करावा, अशी मागणी मुरगाव पालिकेचे नगराध्यक्ष नंदादीप राऊत व अन्य नगरसेवकांनी केली आहे. वास्कोवासीयांच्या हितासाठी हाच एकमेव पर्याय असल्याचे माजी नगराध्यक्ष क्रितेश गावकर यांनी मत व्यक्त केले आहे. वास्को शहरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील झोपडपट्टीतून कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्या वस्तीतील लोकांचा संपर्क वास्कोतील अनेकांकडे झाला असेल. अनेक सरकारी कार्यालयात त्या वस्तीतील लोकांनी ये-जा केलेली असेल, हे जाणून मुरगाव पालिका, वास्को पोलिस स्टेशन, पोस्ट ऑॅफिस, वीज कार्यालय ही ठिकाणे सॅनिटाईज करण्यात येणार आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागल्याने वास्कोतील जनता भयभीत झाली आहे. त्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी काही काळासाठी वास्को परिसर सील करणे आवश्यक आहे. याविषयी आमदार कार्लूस आल्मेदा यांच्याशी आपण चर्चा केली आहे, असे राऊत यांनी सांगितले.
 

संबंधित बातम्या