कसिनो सुरू केल्याने कोरोनाच्या धोक्यात वाढ; विधानसभा अधिवेशन बोलवण्याची मागणी

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

गोव्यासारख्या छोट्या राज्यातील हे मृत्यूचे प्रमाण गंभीर आहे. पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी कसिनोंना परवानगी दिल्याने कोरोना महामारीचा धोका निर्माण झाला आहे. राज्यात प्रभावी व कार्यक्षम प्रशासनासाठी विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी राज्यपालांनी विधानसभा अधिवेशन बोलवण्याची मागणी करणारे निवेदन आज पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी सादर केले. 

पणजी :  भाजप सरकारचे प्रशासन राज्यातील कोरोना स्थिती हाताळण्यास अपयशी ठरले आहे. प्रशासनाच्या या गैरव्यवस्थापनामुळेच राज्यात कोरोना संसर्ग होऊन सहाशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला. गोव्यासारख्या छोट्या राज्यातील हे मृत्यूचे प्रमाण गंभीर आहे. पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी कसिनोंना परवानगी दिल्याने कोरोना महामारीचा धोका निर्माण झाला आहे. राज्यात प्रभावी व कार्यक्षम प्रशासनासाठी विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी राज्यपालांनी विधानसभा अधिवेशन बोलवण्याची मागणी करणारे निवेदन आज पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी सादर केले. 

देशात कोरोनाचे प्रमाण वाढत असताना गोवा राज्य सुरक्षित होते व ते ग्रीन झोनमध्ये होते. मात्र, सरकारच्या गैरव्यवस्थापनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढण्यास सुरुरवात झाली व त्यानंतर स्थिती सरकारच्या नियंत्रणाबाहेर गेल्यावर ती आटोक्यात आणण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. कोरोना महामारी संसर्ग प्रमाण कमी झालेले नाही. राज्याच्या सीमा खुल्या झाल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक गोव्यात येऊ लागले आहेत. कसिनोंना परवानगी देण्यात आली आहे. कोविड - १९ च्या मार्गदर्शक सूचनांची सक्ती करण्यात आली असली तरी त्याचे काटेकोरपणे पालन पर्यटकांकडून होण्याची शक्यता कमीच असून त्याचा परिणाम संसर्ग फैलावण्यात होऊ शकतो. गोवा पर्यटन स्थळ असल्याने मोठ्या प्रमाणात देश विदेशातून पर्यटक येण्याची शक्यता असल्याने त्या दृष्टीने सरकारने कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका टाळण्यासाठी योग्‍य त्या उपाययोजना करण्याची गरज आहे असे खंवटे यांनी निवेदनात म्हटले आहे.  राज्यात कोरोना संसर्गाचा धोका टळलेला नाही. हा धोका येणाऱ्या काळात पुन्हा वाढण्याची शक्यता आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

त्यांनी संकेत देऊनही त्याचा सामना करण्यासाठी आवश्‍यक प्रमाणात साधनसुविधा, डॉक्टर्स व प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांची उणीव आहे. त्यामुळे राज्यात अनलॉकच्या पार्श्‍वभूमीवर सर्व व्यवसाय सुरू करण्यास निर्णय घेणे बेतावर ठरू शकते. पर्यटकांना मार्गदर्शक सूचनांची सक्ती केली तरी त्याची अंमलबजावणी होणे कठीणच आहे. कसिनोंना द्वार खुले करून कोरोना संसर्ग रुग्णांना आमंत्रण देण्यासारखे आहे. सरकारने सनबर्न या नृत्यरजनी महोत्सवाला परवानगी दिली आहे. या महोत्सवाला हजारो देशी विदेशी पर्यटक भेट देतात त्यामुळे राज्यातील कोरोना स्थिती आटोक्याबाहेर जाणार आहे. या महोत्सवामधून सरकारला व पर्यटन व्यवसायिकांना महसूल मिळत असला तरी कोरोना महामारीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. इंग्लंडने कोरोना महामारीचा दुसरा टप्पा सुरू झाल्याने टाळेबंदी करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे गोव्यानेही सतर्क राहण्यासाठी अनलॉकच्या नावाखाली सर्वच व्यवहार खुले करू नयेत यासाठी राज्यपालांनी सरकारने घेतलेल्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप करावा, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

संबंधित बातम्या