गोव्यात का वाढतेय गावठी मासळीची मागणी..? जाणुन घ्या

दैनिक गोमंतक
गुरुवार, 10 जून 2021

समुद्रातील मासळी ताजी फटफटीत नसली, तरी या मासळीचे दर मत्स्यखवय्यांच्या आवाक्‍याबाहेर आहेत.

डिचोली: बाजारातील मत्स्यखवय्यांच्या (Fish) गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी स्थलांतरीत केलेल्या डिचोलीतील (Bicholim) मासळी विक्रेत्यांनी एकाच दिवसाच्या अनुभवानंतर पुन्हा बाजाराच्या ठिकाणी धाव घेतली आहे. या विक्रेत्यांनी पुन्हा बाजार परिसरात मासळी (Fish) विक्रीही सुरू केली आहे. ‘संचारबंदी’मुळे गर्दीवर नियंत्रण यावे, त्यासाठी बाजार परिसरात बसणाऱ्या मासळी विकेंत्यांचे (Fish sellers)काल स्थलांतर करताना पालिकेने या विक्रेत्यांची सेझा (वेदांता) खाण कंपनीच्या जंक्‍शनच्या अलीकडे मये गावाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूने व्यवस्था केली होती. काल मंगळवारी डिचोलीतील बहुतेक मासळी विक्रेते मासेविक्री त्या ठिकाणी बसले होते. मात्र, ज्या ठिकाणी मासळी विक्रेत्यांची व्यवस्था करण्यात आली होती, ती जागा बाजारापासून साधारण दिड किलोमीटर लांब आणि एकाबाजूने असल्याने, बहुतेक मत्स्यखवय्यांची गैरसोय झाली. (Demand for village fish from fish eaters in Goa)

अपेक्षेप्रमाणे या मासळी विक्रेत्यांना ग्राहकही मिळाले नाहीत. त्यातच त्याठिकाणी आसऱ्याची सोय नसल्याने अखेर आज या मासळी विक्रेत्यांनी बाजारात धाव घेताना आपल्या सोयीच्या जागेत बसून व्यवसाय सुरू केला. ज्या ठिकाणी आमचे स्थलांतर केले होते, ती जागा सोयीस्कर नाही आणि ग्राहकही नाहीत. काल आमचा धंदा झाला नाही. आम्ही केवळ माशा मारण्याचेच काम केले. अशी कैफियत काही मासळी विक्रेत्यांनी मांडली. 

गोव्यात आंब्याच्या उत्पादनामध्ये घट का झाली? जाणुन घ्या

‘संचारबंदी’मुळे मासळी मार्केट बंद झाल्यापासून मागील काही दिवसांपासून पालिका इमारतीच्या मागच्या बाजूने गावकरवाड्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर तसेच शहरातील अन्य मोक्‍याच्या ठिकाणी बसून मासळी विक्रेते मासळी विक्री करीत आहेत.

गावठी मासळीचे दिवस..!
डिचोली बाजारात अजूनही समुद्रातील मासळी उपलब्ध होत असली, तरी तिचे प्रमाण अगदीच कमी आहे. समुद्रातील केवळ ठराविक प्रकारचेच मासे दिसून येत आहेत. सध्या गावठी मासळीचे दिवस असून चोडण, नार्वे, पिळगाव, खोर्जुवे आदी ठराविक भागातून खेकडे, काळुंद्रे, करमट, सुंगटे आदी गावठी मासळी डिचोली बाजारात उपलब्ध होत आहेत. 

शंभर रुपयांना दोन बांगडे
समुद्रातील मासळीच्या दराच्या तुलनेत गावठी मासळीच्या दरात मोठासा फरक जाणवत नाही. त्यामुळे अधिकाधिक मत्स्यखवय्ये गावठी मासळीला पसंती देत आहेत. समुद्रातील मासळी ताजी फटफटीत नसली, तरी या मासळीचे दर मत्स्यखवय्यांच्या आवाक्‍याबाहेर आहेत. मध्यम आकाराचे बांगडे 100 रुपयांना दोन नग, समुद्रातील कोळंबी, सोवनाळे, खेकडे 400 रुपये किलो, मुड्‌डशा 500 रुपये किलो तर वेर्ल्या 200 रुपये वाटा या दराने विकण्यात येत आहे.

संबंधित बातम्या