रायबंदर येथे सुसज्ज आरोग्य केंद्र उभारण्याची मागणी

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020

रायबंदर येथील गोमेकॉ इस्पितळाची जुनी इमारत ही पुरातन वारसा आहे व त्याला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी पूर्णवेळ आरोग्य केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली. या केंद्राचा उपयोग आजुबाजूच्या परिसराला मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी सुसज्ज अशा आरोग्य केंद्राची गरज आहे ज्यामध्ये इस्पितळ तसेच बाह्यविकास विभाग असतील.

पणजी- रायबंदर आरोग्य समितीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची आल्तिनो येथील शासकीय बंगल्यावर भेट घेऊन रायबंदर येथील गोमेकॉ इस्पितळ जुन्या इमारतीचे रुपांतर सुसज्ज आरोग्य केंद्रात करण्याची मागणी केली. त्यांची ही मागणी पूर्ण करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी दिली. 

रायबंदर येथील गोमेकॉ इस्पितळाची जुनी इमारत ही पुरातन वारसा आहे व त्याला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी पूर्णवेळ आरोग्य केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली. या केंद्राचा उपयोग आजुबाजूच्या परिसराला मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी सुसज्ज अशा आरोग्य केंद्राची गरज आहे ज्यामध्ये इस्पितळ तसेच बाह्यविकास विभाग असतील. हे आरोग्य केंद्र गोमेकॉ इस्पितळाच्या देखरेखीखाली असावे त्यामुळे ज्या सुविधा लागतील त्या पुरविणे सोयीचे होणार आहे. ही इमारत आशियातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय असून ते १३ डिसेंबर १८६७ मध्ये स्थापन झाले होते. त्यामुळे या इमारतीला इतिहास असून हे पुरातन वारसा बांधकामाचे जतन करण्याची गरज आहे. या इमारतीची डागडुजी करून गोमेकॉ इस्पितळाप्रमाणेच काही अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रणा उपलब्ध करण्यात यावी अशी मागणी या समितीने केली. 

रायबंदर येथील हे सुसज्ज आरोग्य केंद्र मध्यवर्ती ठिकाणी असल्याने त्याचा फायदा रायबंदरवासियांव्यतिरिक्त चोडण माडेल, जुने गोवे, रायंबदर, चिंबल, दिवाडी व मेरशी या भागांना होणार आहे. रात्रीच्यावेळी या भागातील लोकांना गोमेकॉ इस्पितळात जाण्यास वाहनांची गैरसोय होते त्यामुळे रायबंदर येथील आरोग्य केंद्र उपयुक्त ठरणार आहे. जनतेला आरोग्य सुविधा देण्यामध्ये निधीचा तुटवडा असल्याचे कारण योग्य होणार नाही, असे ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

संबंधित बातम्या