लोकशाहीत लोकप्रतिनिधींना प्रश्‍‍न विचारण्‍याचा अधिकार

प्रतिनिधी
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

हर्षद देसाई : सूडाचे राजकारण न करण्‍याचा वीजमंत्र्यांना सल्ला

कुडचडे: वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी सोशल मीडियावर कोण तरी जिल्हापंचायत निवडणुकीसाठी उभा राहिलेल्या उमेदवारांकडे दोन दोन मतदार ओळखपत्रे असल्याचे वक्तव्य केले होते. त्याचा खरपूस समाचार घेताना काँग्रेस पक्षाचे जिल्हा पंचायत उमेदवार हर्षद हरी गावस देसाई यांनी पत्रकार परिषदेत घेतला. आपले बालपण, शिक्षण कुडचडेत झाले.  पण काब्राल कोण, कुठले आणि कुडचडेत का आले याची पूर्ण जाणीव कुडचडेतील जनतेला आहे. काब्राल यांनी आपल्याला दाखला देण्याची मुळीच गरज नसून सूडाचे राजकारण न करता लोकशाहीनुसार लोकप्रतिनिधींना स्‍थानिक म्‍हणून प्रश्न विचारायचा हक्क आहे, असे पत्रकार परिषदेत सांगितले.

पत्रकार परिषदेत त्यांच्यासोबत काँग्रेस पक्षाचे सेक्रेटरी अली शेख, अन्वर शेख व युवा अध्यक्ष ॲड. विराज नागेकर हे उपस्थित होते. पुढे बोलताना हर्षद गावस देसाई म्हणाले, आपल्याकडे निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेले लोकशाही मार्गातील मतदार ओळखपत्र आहे. या पूर्वी लोकसभा निवडणूकीत शेल्‍डे येथून मतदान केले आहे. नीलेश काब्राल हे कुडचडेचे नसताना कुडचडेतील जनतेने निवडून आणले व आमदार बनविले, याची महोदयांनी आठवण ठेवावी. त्याचबरोबर वीजखात्याच्या ट्रक दुर्घटनेत ज्या तिघांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला त्यांना सहानुभूती पूर्वक भावार्थ न दाखविता ‘मेले ते मेले’, युनियन पन्नास लाखांची मागणी करतात, तीन कोटी मागा, अशी मंत्री काब्राल यांनी केलेली विधाने अयोग्‍य आहेत. 

वायरिंग कंत्राटमध्ये कथित शंभर कोटींचा घोटाळा झाला असताना साधी चौकशी केली जात नाही. आतापर्यंत होऊन गेलेल्या वीजमंत्र्यापैकी अत्यंत वाईट परिस्थिती काब्राल यांच्या वीजमंत्री कालावधीत झाली आहे. लाईनमनकडे टॉर्च नाही, गमबूट नाही इतर आवश्यक साहित्य नाही या गोष्टीकडे लक्ष न घालता आपल्या विरोधात बोलणाऱ्यांना लक्ष्‍य करणे योग्‍य नाही, असेही ते म्‍हणाले.

संबंधित बातम्या