अश्लील चित्रफीत पोस्ट केल्याने उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर अडचणीत

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

सरकार चालविणारे अशाप्रकारे वागू लागले, तर राज्य कोणत्या दिशेने जात आहे असा प्रश्‍न उपस्थित करत सध्याची परिस्थिती बघितल्यास गोवा हे वाईट प्रवृत्तीकडे जात असल्याचे गोवा महिला फॉरवर्ड व गोवा प्रदेश काँग्रेस महिला नेत्यांनी आज महिला पोलिस स्थानकात तक्रार दाखल करताना म्हटले आहे.  

पणजी- उपमुख्यमंत्री चंद्रकांत(बाबू)कवळेकर यांनी ‘व्हिलेजिस ऑफ गोवा’ व्हॉट्‍सॲप ग्रुपवरून अश्‍लील चित्रफीत पोस्ट केल्याप्रकरणी गोवा महिला फॉरवर्ड व गोवा प्रदेश काँग्रेस महिला नेत्यांनी आज महिला पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. ही चित्रफीत महिलांची बदनामी करणारी असल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

व्हॉट्‍सॲप ग्रुपवरून पोस्ट केलेली चित्रफीत अश्‍लील असल्याची संशयिताला कल्पना होती, तरीही ती ग्रुपवर टाकण्यात आली आहे. या चित्रफीतीमुळे महिलांचे चारित्र्यहनन झाले आहे. तसेच या व्हॉट्‍सॲप ग्रुपवर काही महिलाही सदस्य आहेत. ही चित्रफीत पाहिल्यास महिलांना धक्का बसला. अशाप्रकारची अश्‍लील चित्रफीत पोस्ट करणे गुन्हा असल्याने त्यांच्याविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा तसेच महिलांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करावा, असे तक्रारीत म्हटले आहे. 

या अश्‍लील चित्रफीतप्रकरणी भाजप महिला मोर्चाच्या नेत्या अजूनही गप्प आहेत. मागील विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वी भाजप महिला नेत्यांनी एका काँग्रेस नेत्याच्या बदनामीप्रकरणी आवाज उठविला होता. मात्र, सध्या त्यांचा आवाज बंद आहे. या प्रकरणाबाबत त्या शांत का आहेत? असा प्रश्‍न गोवा महिला फॉरवर्डच्या सरचिटणीस क्लारा रॉड्रीगीस यांनी पत्रकार परिषदेवेळी करून म्हणाल्या, उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी हा भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष आहेत. अशाप्रकारच्या महिलांचे चारित्र्य हनन व बदनामी करणाऱ्या चित्रफीतींची गय केली जाणार नाही. 

भाजपच्या महिला नेत्या याप्रकरणी गप्प आहेत यावरून त्या उपमुख्यमंत्र्यांना पाठिशी घालत असल्याचा अर्थ होतो. सरकार चालविणारे अशाप्रकारे वागू लागले, तर राज्य कोणत्या दिशेने जात आहे, असा प्रश्‍न त्यांनी केला. सध्याची परिस्थिती बघितल्यास गोवा हे वाईट प्रवृत्तीकडे जात आहे. यावेळी त्यांच्यासोबत गौरी कवळेकर, केसर हरमलकर व मेरी कुएल्हो उपस्थित होत्या. 

दरम्यान, गोवा प्रदेश काँग्रेसतर्फे महिला नेत्या प्रतिभा बोरकर व इतरांनी महिला पोलिस स्थानकात उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या विरुद्ध अश्‍लील चित्रफीत व्हॉटस्अॅप ग्रुपवरून पोस्ट केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी केलेला हा गुन्हा गंभीर असल्याने पोलिसांनी त्वरित त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या