प्रतिबंध असतानाही कपडे, वाहने धुणे सुरूच

प्रतिनिधी
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

‘चामरकोंड’ नदीतील प्रकार, संबंधितांचे दुर्लक्ष; दंडात्मक कारवाईची गरज

डिचोली:  प्रतिबंध असतानाही डिचोली तालुक्‍यातील म्हावळिंगे - कुडचिरे पंचायत क्षेत्रातील चामरकोंड नदी पात्रात कपडे आणि वाहने धुण्याचे प्रकार सर्रासपणे चालू असतात. अस्वच्छतेवर नियंत्रण आणण्यासाठी पंचायतीतर्फे प्रतिबंध करताना तशा आशयाचा इशारा वजा सूचना फलक नदीजवळ लावण्यात आला आहे. तरीदेखील या सुचनेकडे दुर्लक्ष करून नदी पात्रात कपडे आणि वाहने धुण्याचे प्रकार सर्रासपणे चालूच आहेत. 

अधूनमधून काही मासळी विक्रेते नदीत मासळीचे बकेटही धुताना आढळून येत असल्याची माहिती मिळाली आहे. यात पंचायत क्षेत्राबाहेरील तसेच परराज्यातील व्यक्‍तींचा अधिक समावेश असतो. जोपर्यंत दंडात्मक कारवाई होत नाही. तोपर्यंत हे प्रकार चालूच राहून नदीचे अस्तित्व संकटात येणार असल्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. उन्हाळ्यात पाण्याचा प्रवाह कमी झाला, की या प्रकारावर काहीसे नियंत्रण असते. नदीत कपडे धुतानाच खास करून रविवारी आणि पावसाळ्यात नदीत वाहने धुण्याचे प्रकार अधिक घडतात. या नदीच्या पात्रात कचराही फेकण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे ही नदी प्रदुषणाच्या विळख्यात अडकली आहे. 

म्हावळिंगे येथील चामरकोंड पुलाखाली नदीच्या पात्रात गेल्या बऱ्याच वर्षांपासून महिलांकडून कपडे आणि वाहने धुण्याचे प्रकार घडत आहेत. या प्रकाराकडे कोणाचेच लक्ष नसल्याने नदीच्या पात्रात अस्वच्छता निर्माण होऊन ती प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. 

संबंधित बातम्या