किफायतशीर असूनदेखील नाचणी ‘लागवडी’कडे दुर्लक्ष!

प्रतिनिधी
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

डिचोली तालुका हा कृषीसंपन्न असून, या तालुक्‍यातील बहूतेक भागात पारंपरिक भातशेती आदी पिक घेण्यात येत आहे. मात्र, अलीकडच्या काळात तालुक्‍यात नाचणी लागवडीचे प्रमाण घटत आहे.

डिचोली: , ता. १६ ()-डिचोली तालुका हा कृषीसंपन्न असून, या तालुक्‍यातील बहूतेक भागात पारंपरिक भातशेती आदी पिक घेण्यात येत आहे. मात्र, अलीकडच्या काळात तालुक्‍यात नाचणी लागवडीचे प्रमाण घटत आहे.

आहारातील एक प्रमुख तृणधान्य असलेले नाचणी पिक हे अनेकदृष्ट्या किफायतशीर असले, तरी तालुक्‍यात नाचणी लागवडीबाबत शेतकऱ्यांमध्ये उदासिनता असल्याचे दिसून येत आहे. धुुमासे, बोर्डे, कुडचिरे आदी काही ठराविक भागातच नाचणी लागवडीचे अस्तित्व अद्याप तरी दिसून येत आहे. डिचोली तालुक्‍यात वायंगण मिळून 3 हजार हेक्‍टरहून अधिक शेतजमीन आहे. वीस-पंचवीस वर्षापूर्वी एक काळ असा होता, की खरीप हंगामात गावोगावी भातशेती बरोबरच भरड शेतीत नाचणीचे पिक घेण्यात येत होते. कालांतराने या लागवडीकडे हळूहळू दुर्लक्ष होवू लागले. आता तर तालुक्‍यात नाचणी लागवडीचे प्रमाण कमी झाले आहे. नगदी आणि किफायतशीर पिक असलेल्या नाचणीला आजही मागणी कायम आहे. त्यामुळे या पिकाच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना आकर्षित आणि प्रोत्साहीत करण्यासाठी कृषी खात्याने भर देण्याची गरज आहे. सध्याच्या घडीस नाचणीचे दर 42 रु. किलो असे आहेत.  

नाचणीचे गुणधर्म !
तृणधान्य हे आहारातील महत्वाचे घटक आहेत. त्यापैकीच एक म्हणजे नाचणी. नाचणी हे एक पोषणयुक्‍त समृध्द असे पौष्टिक तृणधान्य आहे. दैनंदिन आहारातील गहू, तांदूळ, ज्वारी यांच्यापेक्षा नाचणीमध्ये पौषकद्रव्ये ज्यास्त असतात. यात खनिजद्रव्ये, तंतूमय पदार्थ आणि जीवनसत्वांचा समावेश होतो. पारंपरिक पदार्थांचे पोषण मुल्य वृध्दींगत करण्यासाठी नाचणीचा उपयोग करता येतो. नाचणीासून गोड आणि तिखट पदार्थ बनवता येतात.  नाचणीमध्ये प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि उर्जा साधारणपणे अन्य तृणधान्या इतकीच आहे. नाचणीमध्ये कॅल्शिअम आणि फॉस्फरचे प्रमाण भरपूर आहे. ही दोन्ही खनिजद्रव्ये दात आणि हाडांची वाढ आणि मजबूतीसाठी आवश्‍यक असते. 

नाचणीयुक्‍त सत्व आदी पदार्थ लहान मुले आणि गरोदर स्त्रियांसाठी अतिशय लाभदायक आहे. तंतुमय पदार्थ ज्यास्त असल्याकारणाने नाचणीचा ग्लायसेमीक इंडेक्‍स कमी आहे. त्यामुळे नाचणी मधूमेहींसाठी उपयुक्‍त आहे.  नाचणीतील तंतुमय पदार्थांमुळे कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. 

नाचणीत ब वर्गीय जीवनसत्वे असल्याने रोग प्रतिकारशक्‍ती वाढवण्यास मदत होते. 

संबंधित बातम्या