असुरक्षित इमारत असूनही भाड्याचा मोह आवरेना

Dainik Gomantak
सोमवार, 15 जून 2020

या इमारतीत घुशींचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. तिसऱ्या मजल्यावर असलेल्या फरश्‍या निखळल्या असून, त्याठिकाणी घुशी आतबाहेर बिनधास्तपणे फिरताना नजरेस पडतात. इमारतीच्या सज्जावरून पावसाचे पाणी सतत ठिबकत असून, इमारत धोकादायक असल्याचेच दर्शवित आहे.

विलास ओहाळ
पणजी : पणजी मासळी मार्केटच्या शेजारील महापालिकेच्या मालकीची आणि स्वतः महापालिकेनेच असुरक्षित म्हणून जाहीर केलेल्‍या चार मजली इमारतीत सुमारे २५ खोल्यांमध्ये शंभरच्यावर कामगारवर्ग राहत आहेत. असुरक्षित असलेल्या या इमारतीच्‍या मजल्यांवरील फरशीचा भाग घुशींनी पोखरला असून, ती इमारत आणखी धोकादायक बनली आहे. परंतु, दोन मजल्यांवरील हजारो रुपयांच्या भाड्यापोटी या कामगारांचा जीव धोक्यात घालण्यात एका माजी नगरसेवकाचा हात असल्याची महापालिकेतच चर्चा आहे.
असुरक्षित इमारत म्हणून घोषित झाला असतानाही भाड्यातून मिळणाऱ्या ‘माये’पोटी परराज्यातील कामगारांना मिळत नसलेल्या निवाऱ्याचा फायदा उचलण्यात येत आहे. या इमारतीतून चिकन विक्रेते, मांस विक्रेते, वकील यांच्‍यामार्फत व मार्केटमधून काही प्रमाणात महापालिकेला महसूल मिळतो. परंतु, इमारतच धोक्यात असल्याने मिळणारा महसूल घेताना महापालिकेला काही अघटित घटना घडल्यास महागात पडू शकते. याचाही विचार महापालिकेला करावा लागणार आहे. या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील उत्तर बाजूच्या बाजूची गॅलरी भिंत घालून अडविण्‍यात आली आहे. त्यात खोल्या काढून त्या भाड्याने दिल्या आहेत.

चौकट करणे
घुशींचा वावर!
या इमारतीत घुशींचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. तिसऱ्या मजल्यावर असलेल्या फरश्‍या निखळल्या असून, त्याठिकाणी घुशी आतबाहेर बिनधास्तपणे फिरताना नजरेस पडतात. इमारतीच्या सज्जावरून पावसाचे पाणी सतत ठिबकत असून, इमारत धोकादायक असल्याचेच दर्शवित आहे. एका मजल्यावरील मोकळ्या जागेत लाकडी प्लायवूडचा वापर करून भाडेकरू ठेवण्यासाठी खोली तयार करण्यात आली आहे. जिन्यावरील स्लॅब धोकादायक असल्याने एक मार्ग बंद करण्यात आला आहे.

एका खोलीत राहतात पाच ते सहाजण!
मनपाच्‍या इमारतीत भाड्याने राहणाऱ्या एका कामगाराने सांगितले की, एका खोलीत किमान पाच ते सहाजण राहतात. ज्या खोलीत शौचालयाची सोय आहे त्या खोलीला सात हजार, तर ज्या खोलीत शौचालय नाही अशा खोलींना पाच हजार रुपये भाडे घेतले जाते. या ठिकाणी कचरा नेण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी येतात, परंतु येथील कामगार कचरा व्‍यवस्‍थित ठेवत नाहीत. धोकादायक इमारत असूनही कसे राहता, असे म्हटल्यानंतर एवढ्या स्वस्तात कोठे खोली मिळणार, असा सवाल त्या कामगाराने केला.
या खोल्यांतून राहणारे कामगार हे बिहार, आसाम, झारखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश अशा ठिकाणचे आहेत. या खोल्यांमध्ये भाडेकरू ठेवण्यामध्ये माजी नगरसेवकाचा हात आहे, हे काही लपून राहिलेले नाही. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही या इमारतीच्या खोल्यांना टाळे ठोकले होते, परंतु तत्कालीन आयुक्तांकडून पुढील कागदोपत्रांची प्रक्रिया करण्याची राहून गेली. त्याचा फायदा उचलत त्या खोल्या भाडेकरूंसाठी खुल्या झाल्या. या इमारतीविषयी बाजार समितीला आता लक्ष घालावे लागणार आहे, अन्यथा अघटित घटना घडण्याची महापालिका वाट पाहतेय का? असा सवालही उपस्थित होत राहणार आहे. नगरसेवक रूपेश हळर्णकर यांनी अनेक सर्वसाधारण सभेत या इमारतीचा प्रश्‍न मार्गी लावावा, अशी मागणी केली आहे.

संबंधित बातम्या