सकाळी कामावर निघाले, पण संध्याकाळी परत न येण्यासाठीच...!

दैनिक गोमंतक
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

कुटुंबाला हातभार लावणारे कमवते हातच काळाने हिरावून नेल्याने दाली व फर्नांडिस कुटुंबावर तर आभाळच कोसळले आहे.

फोंडा : कुटुंबाला आधार व्हावा यासाठी कमी वयातच पाळीतील चंद्रकांत आणि अलिशा यांनी खाजगी आस्थापनात नोकरी पत्करली होती. चंद्रकांत व अलिशा ही दोघेही फोंड्यातील वेगवेगळ्या खाजगी आस्थापनात नोकरी करीत होती. दोघांचीही चांगली ओळख होती व नोकरी एकाच शहरात करीत असल्याने दोघेही अधूनमधून एकत्र कामाला येत होती. सकाळी कामावर निघण्यासाठी दोघेही बाहेर पडली खरी, पण संध्याकाळी परत न येण्यासाठीच...!

 
चंद्रकांत दाली याच्या घरी आई, वडील व एक धाकटा भाऊ आहे. तर अलिशा फर्नांडिस हिच्या घरी तिची आई व दोन भाऊ असा परिवार आहे. दोन्ही कुटुंबे गरीब असल्याने कुटुंबाला आधार व्हावा यासाठी दोघांनीही शिक्षण अर्ध्यावर सोडून नोकरी स्विकारली होती.  
चंद्रकांत हा मनमिळाऊ स्वभावाचा होता. त्याचा मित्रपरिवारही मोठा होता. अलिशाचाही स्वभाव मनमोकळा होता. 

फोंड्यात कामावर येण्यासाठी सकाळी निघाल्यानंतर या आस्थापनातील त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांच्या अपघाताचे वृत्त समजल्यावर त्यांना धक्काच बसला. अपघाताचे दृष्यही भीषण होते. विशेष म्हणजे दुचाकीच्या दर्शनी व मागच्या बाजूची मोठी हानी झाली होती. अपघाताचा प्रत्यक्षदर्शी कुणी नसल्याने याप्रकरणी उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत होत्या. मात्र फोंडा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर पार्क केलेल्या ट्रकला निसटती ठोकर बसल्यानेच स्कूटर उसळून पडली, त्यामुळे स्कूटरचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले. 

कुटुंबाला हातभार लावणारे कमवते हातच काळाने हिरावून नेल्याने दाली व फर्नांडिस कुटुंबावर तर आभाळच कोसळले आहे. अलिशाची आई आणि तिच्या दोन्ही भावांना तर मोठा धक्काच बसला असून चंद्रकांतच्या कुटुंबियांचीही हीच गत झाली आहे.

इंधन नसल्याने ट्रक पडला बंद!
अपघाताला कारणीभूत ठरलेला ट्रक इंधन नसल्याने रस्त्यावरच बंद पडला. हा ट्रक रस्त्यावरच सोडून ट्रकचालक नाऊ झोरे भामई येथील पेट्रोलपंपवर डिझेल आणण्यासाठी गेला. मात्र त्याने ट्रक रस्त्यावर सोडताना त्यासंबंधी कोणतीच काळजी घेतली नाही, त्यामुळेच अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. ट्रकचालकाच्या निष्काळजीपणाबद्दल गुन्हा नोंदवण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

खनिज वाहतुकीला अपशकून!
खनिज वाहतूक बऱ्याच काळानंतर सुरू झाली असली तरी प्रारंभालाच खनिजवाहू ट्रकामुळे दोघांचे बळी गेल्याने खाण व्यवसायाच्या प्रारंभालाच हा अपशकून झाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पावसाळ्यानंतर प्रथमच उसगावमार्गे खनिज वाहतूक सुरू झाली होती. त्यापूर्वी दरासंबंधी घासाघीस झाली होती. मात्र खनिज वाहतूक सुरू झाली असली तरी दोन कुटुंबाच्या कमवत्यांनाच घेऊन गेली. 

बाराजण - उसगावातील हा अपघात म्हणजे दुर्दैवी घटना असून युवावस्थेतील दोघांचे बळी म्हणजे त्यांच्या दोन्ही कुटुंबांवर मोठा घाला आहे. निष्काळजीपणामुळेच अपघात होतात, त्यामुळे वाहन चालवताना प्रत्येकाने काळजी ही घ्यायलाच हवी.
- तुळशीदास गाड, माजी सरपंच, उसगाव

दोन्ही मयतांचे कुटुंब हे गरीब असल्याने या दोन्ही कुटुंबांना आर्थिक सहाय्य करण्याची खरी गरज आहे. कुटुंबाला आधार व्हावा म्हणून या दोघांनी नोकरी पत्करली, पण या अपघाताने घरच्यांची रोजीरोटीच हिरावल्यासारखी झाली आहे, त्यामुळे खाण कंपन्या किंवा सरकारने त्यांना मदत करण्याची आवश्‍यकता आहे.
- प्रवीण गावकर, तिस्क - उसगाव

संबंधित बातम्या