खनिज कंपन्यांकडून नैसर्गिक संपदेचा विद्‍ध्वंस

Padmakar Kelkar
रविवार, 2 ऑगस्ट 2020

पिसुर्ले - सत्तरी भागात गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ खनिज खाण व्यवसाय सुरू आहे. पोर्तुगीज काळापासून सुरू असलेल्या व्यवसायामुळे सध्याच्या स्थितीत शेती करणे कठीण बनलेले आहे. कारण शेतात मातीचा गाळ परसलेला आहे. अनेक वर्षांपासून खनिज कंपन्यांनी हळुहळू येथील जमिनींवर कब्जा करून व्यवसाय वाढविला व त्याचा थेट अनिष्ट परिणाम शेती, बागायतीवर झाला आहे

वाळपई

. कंपन्या जमिनी खणत गेल्या म्हणूनच येथील नैसर्गिक साधन संपत्तीचा सर्वनाश होत गेला आहे. व्यवसाय वाढविण्याच्या नादात खनिज कंपन्यांनी पिसुर्ले भागातील नैसर्गिक संपदेचा विद्ध्वंस केल्याचा आरोप पिसुर्ले शेतकरी संघटनेने वाळपई येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.
संघटनेचे अध्यक्ष हनुमंत परब, पदाधिकारी जयेश्वर गावडे यांची यावेळी उपस्थिती होती. हनुमंत परब म्हणाले, सुरवातीच्या काळात पिसुर्लेत हाताने खणून खनिज माती काढली जायची. १९८० पासून मशिनरींचा वापर केला जाऊ लागला. आज कंपन्यांच्या बेजबाबदारपणामुळे १५२ शेतकरी वर्गांवर संकट कोसळले आहे. ८० एकर शेती बागायती जमिनी खनिज व्यवसायापायी नापिक बनलेल्या आहेत. १९९७ साली खनिज खंदकातील पाणी बागायतीला देत होते, पण २००० सालापासून शेती पूर्णपणे बंद स्थितीत आहे. शेतात माती साचल्याने पीक घेणे बंद झाले. पाण्याचे स्त्रोत बंद झाले. आज खनिज खंदकात पाणी मोठ्या प्रमाणावर साचलेले असून हे खंदक कधीही फुटून त्याचा परिणाम देऊळवाडा, हरिजनवाडा आदी वाड्यांवर होणार आहे.
खंदकाची भिंत फुटल्यास खनिज माती पाण्यासोबत वाहून घरांमध्ये घुसणार आहे. अशी स्थिती वीस वर्षांपूर्वी खंदकाची भिंत फुटून खंदकातील पाणी वाहून घरांमध्ये चिखल साचला होता. तीच घटना पुन्हा होण्याची भीती आहे. म्हणूनच सरकारने या गंभीर गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे. शेतकरी वर्गाला वेळेत नुकसान भरपाई दिली पाहिजे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना गेल्या वर्षी निवेदने दिली होती, पण वर्ष उलटले तरीही सरकारकडून कार्यवाही केलेली नाही. प्रसंगी शेतकरी वर्गाला उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार आता संबंधित अधिकारी वर्गांनी भागाची पहाणी केली आहे, पण अजून कंपनीने खंदकातील पाणी उपसणे सुरू केलेले नाही. केवळ पंप आणून ठेवले आहेत. पिसुर्लेतील खनिज खंदकातील पाणी मोठ्या प्रमाणावर पावसाळ्यात साचलेले आहे. सध्या भर पावसाळ्यात लोकवस्तीतून खनिज वाहतूक केली जात आहे, पण सरकारी यंत्रणा कारवाई करण्यास तयार नाही, असेही परब म्हणाले.

संपादन - यशवंत पाटील

संबंधित बातम्या