Coastal Regulation Zone: नैसर्गिक ढालींचा विध्वंस केला तर गोवा संपेल : मास्कारेन्हस

सडेतोड नायक : सीआरझेड नियम शिथिल केल्यास गंभीर परिणाम
Dr. Antonio Mascarenhas
Dr. Antonio MascarenhasDainik Gomantak

Coastal Regulation Zone मच्छीमारांना पर्यटन उद्योगात उतरण्याची संधी’ या गोंडस नावाखाली राज्य सरकार सीआरझेड निर्बंध शिथिल करून संपूर्ण समुद्रकिनारा पर्यटन लॉबीच्या घशात घालू पाहात आहे.

हे निर्बंध शिथिल केल्यास किनाऱ्यावरील वाळूच्या लहान टेकड्या (सॅण्ड ड्युन्स) नष्ट होऊन जातील. तसे झाल्यास गोव्यासाठी ते अत्यंत धोकादायक आहे. हे ड्युन्स नष्ट झाल्यास समुद्राचे पाणी थेट गावात घुसेल, असा गंभीर इशारा ‘एनआयओ’चे शास्त्रज्ञ डॉ. आंतोनियो मास्कारेन्हस यांनी दिला.

‘गोमन्तक टीव्ही’वर ‘सडेतोड नायक’ या कार्यक्रमात संपादक-संचालक राजू नायक यांनी घेतलेल्या मुलाखतीत या अत्यंत गंभीर अशा विषयावर डॉ. मास्कारेन्हस म्हणाले, राज्य सरकारने हा प्रस्ताव कोणत्या शास्त्रीय आधारावर तयार केला हे कळत नाही. किनाऱ्यावरील विकास निर्बंध क्षेत्र 200 मीटरवरून 50 मीटरवर आणण्याचे शास्त्रीय कारण काय, असा सवाल त्यांनी केला.

जागतिक तापमान वाढीमुळे समुद्राचे पाणी वाढून किनारपट्टीचा बराच भाग समुद्राच्या पोटात गेला आहे. अशा स्थितीत सीआरझेड निर्बंध अधिक कडक करण्याची गरज होती. मात्र, येथे उलट होत आहे. फक्त जागतिक तापमान वाढीला दोष देऊन चालणार नाही. आम्ही स्वतः दर्याशी कसे खेळतो, हेही पाहिले पाहिजे. समुद्र किनारे ही माणसाची नव्हे, तर महासागराची मालमत्ता आहे, हे लक्षात घेतले पाहिजे, असे ते म्हणाले.

वास्तविक सीआरझेड कायद्याप्रमाणे केरी ते बागा ही संपूर्ण किनारपट्टी विकास प्रतिबंधित क्षेत्र आहे. मात्र, या पट्टयात सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून बांधकामे उभी केली आहेत. शॅक्स उभारण्याच्या नावाखाली वाळूच्या टेकड्यांचा विध्वंस केला जात आहे. आता हा नवा प्रस्तावित कायदा अंमलात आला तर पणजीपासून वेळसांवपर्यंतची सर्व किनारपट्टी सीआरझेड-२ क्षेत्राखाली असल्याने येथील सॅण्ड ड्युन्सचा विध्वंस होऊ शकतो. मागच्या पावसाळ्यात वार्का आणि सेर्नाभाटी येथे समुद्राचे पाणी शॅक्समध्ये घुसले होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Dr. Antonio Mascarenhas
Fire In Goa: सत्तरीचा पश्‍चिम घाट आगीच्या भक्ष्यस्थानी

गोवा सुरक्षित ठेवायचा असेल समुद्र किनाऱ्याबरोबर जो खेळ खेळला जात आहे, तो बंद करून समुद्राचे संवर्धन कसे करता येईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. अन्यथा भविष्यात काय अनर्थ होणार ते कोणीच सांगू शकणार नाही, असा गंभीर इशारा त्यांनी दिला.

...तर समुद्राचे पाणी मडगावात

निसर्गाच्या ढालींचा विध्वंस करण्याचे सत्र जर असेच सुरू राहिले आणि पावसाळ्यात समुद्राचे पाणी मडगाव शहरात घुसले तर कुणी आश्‍चर्य मानू नये. इतकेच नव्हे, तर कांदोळी गावही पाण्याखाली जाऊ शकतो. आम्ही अशा स्थितीत पोहोचलो आहोत की, आताच काही उपाय योजले नाहीत तर उद्या काय होईल, त्याचे चित्रही काढणे अशक्य होईल, असे डॉ. मास्कारेन्हस म्हणाले.

Dr. Antonio Mascarenhas
Fire Cases in Goa : आगीच्या घटनांवर तोडगा काढण्यासाठी दक्षिण जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली उच्चस्तरीय बैठक

‘तो’ ड्युनही महत्त्वाचा

गोवा सरकारने आपल्या प्रस्तावित किनारपट्टी आराखड्यात जर सॅण्ड ड्युन २ मीटरपेक्षा उंच असेल, तरच त्याला ‘ड्युन’ असे मानण्यात येईल, असे म्हटले आहे. यावर डॉ. मास्कारेन्हस म्हणाले, हे ठरविण्यासाठी कोणता शास्त्रीय तर्क वापरला हे कळणे कठीण आहे. कारण 10 सेंटीमीटर उंचीचा सॅण्ड ड्युनही तेवढाच महत्त्वाचा आहे. 2 मीटर उंची हे मोजमाप लावल्यास 90 टक्के ड्युन्स त्या व्याख्येत बसणार नाहीत.

Dr. Antonio Mascarenhas
Pissurlem Industrial Estate: पिसुर्ले औद्योगिक वसाहतीत कंपनीला आग

...तर किनारपट्टीवरील सर्व घरे अनधिकृत

सीआरझेड कायद्यात मच्छीमारांची अधिकृत घरे परत बांधण्याची तरतूद आहे. मात्र, गोव्यात किनारपट्टीवर असलेले एकही घर या कायद्यानुसार अधिकृत ठरू शकत नाही. समुद्र किनाऱ्यावर मोठी बांधकामे आल्यास ते घातक ठरेल, असे डॉ. मास्कारेन्हस म्हणाले.

मांडवी सर्वांत प्रदूषित नदी : पणजी येथील मांडवी नदी पूर्णपणे प्रदूषित असून या पाण्यात ॲण्टीबायोटिक्सचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले आहे. या नदीत मासे आहेत की नाहीत हे कळणेही कठीण आहे, असे डॉ. मास्कारेन्हस यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com