विकासकामांसाठी सरकार कटिबद्ध: आयुष मंत्री श्रीपाद नाईक

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

सगळ्या घटकांपर्यंत सरकारी योजना पोहोचणे व त्यातून सर्वांचा होणारा विकास हा राजकारणाचा खरा उद्देश असतो. अशा सर्व घटकांपर्यंत विकास पोहोचण्यासाठी केंद्र व राज्य सरकार कटिबद्ध आहे,

पेडणे : सगळ्या घटकांपर्यंत सरकारी योजना पोहोचणे व त्यातून सर्वांचा होणारा विकास हा राजकारणाचा खरा उद्देश असतो. अशा सर्व घटकांपर्यंत विकास पोहोचण्यासाठी केंद्र व राज्य सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी कोरगाव येथे केले.

कोरगाव ग्रामपंचायत क्षेत्रात आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी खासदार निधीतून सुमारे ३१ लाख रुपये पथदीप बसविण्यासाठी मंजूर केले आहेत. वीज खांब उभारण्‍यास सुरवात झाली असून त्‍या कामाच्‍या शुभारंभ मंत्री नाईक यांच्या हस्ते नामफलकाचे उद्‍घाटन करण्‍यात आले. 
याप्रसंगी उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर, सरपंच स्वाती गवंडी, पंचायत सदस्य समिल भाटलेकर, उदय पालयेकर, कुस्तान कुयेलो, वसंत देसाई, प्रमिला देसाई, उमा साळगावकर व स्वीकृत पंच मुकुंद जाधव, पेडणे भाजप अध्यक्ष तुळशीदास गावस यांच्‍यासह अन्‍य मान्‍यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले की, कोरोना महामारीमुळे बरीच विकासकामे रखडली. आगामी काळात ती मार्गी लागतील. उत्तर गोव्यात सगळ्या ग्रामपंचायत क्षेत्रात खासदार निधीतून बरीच विकासकामे झाली आहेत. कोरोना महामारीमुळे यंदा निधी उपलब्ध झाला नाही. पुढील वर्षी तो होईल. त्यावेळी ग्रामपंचायतींनी विकासकामांचे प्रस्ताव सादर करावेत. ते संमत केले जातील, असेही आश्‍वासन त्‍यांनी दिले. उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर म्‍हणाले की, नळाद्वारे एक दिवस पाणी न मिळाल्यास कसे हाल होतात याची मला कल्पना आहे. चांदेल जल प्रकल्‍पात भरपूर पाणी उपलब्ध असताना अशा समस्या का निर्माण होतात, यासंबंधी पाणीपुरवठा कार्यालयाच्या अभियंत्यांची बैठक बोलावून समस्या सोडवीन. उपसरपंच अब्दुल नाईक यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

संबंधित बातम्या