फातोर्ड्यातील नगरसेवकांच्या सहकार्यामुळेच मडगावाचा विकास झाला

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

मडगाव पालिका मंडळाच्या कार्यकाळात अनेक चांगले निर्णय घेण्यात आले.फातोर्ड्याच्या सर्व नगरसेवकांच्या सहकाऱ्यामुळेच विकासकामे करता आली, अशी माहिती माजी नगराध्यक्ष बबिता आंगले प्रभुदेसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. या फातोर्डाचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

नावेली :  मडगाव पालिका मंडळाच्या कार्यकाळात अनेक चांगले निर्णय घेण्यात आले. खास करून जनमत कौल चौकात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी कार्निव्हल, शिमगोत्सव व जुलूस एसजीपीडीए मैदानावर घेण्यासाठी ठराव मंजूर करण्यात आला. ज्या ठिकाणी वाहतूक सिग्नल यंत्रणा बसविण्याची गरज आहे अशा ठिकाणी फातोर्डा मतदारसंघाचे आमदार विजय सरदेसाई यांच्या प्रयत्नातून ट्राफिक सिग्नल घालण्यात आले. फातोर्ड्याच्या सर्व नगरसेवकांच्या सहकाऱ्यामुळेच विकासकामे करता आली, अशी माहिती माजी नगराध्यक्ष बबिता आंगले प्रभुदेसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. या फातोर्डाचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

कदंब बस स्थानकाजवळ रस्त्याच्या बाजूला असलेले कपेल पालिकेच्या जागेत स्थलांतरित करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय ते आगाळीपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. मडगावात दारोदारी कचरा गोळा करण्याची मोहीम यशस्वी राबवित ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा करून सोनसड्यावर नेऊन टाकला जातो. पालिकेतील क विभागातील कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा योजना सुरू केली. कामावर असताना अपघातात सापडल्यास १ ते  ५ लाख रुपयांचे विमा कवच देण्यात येणार आहे. मडगाव पालिका क्षेत्रातील पेट्रोल पंपकडून पालिकेला भाड्यापोटी महसूल थकीत होता तो प्रश्न सोडवला व भारत पेट्रोलियम कंपनीकडून पालिकेला सुमारे ६५ लाख रुपये महसूल प्राप्त झाला. लोहिया मैदानाचे सौंदर्यीकरण करण्यासाठी सरकारजवळ प्रस्ताव ठेवला होता, परंतु काम होऊ शकले नाही. माजी राज्यपालांनी लोहिया मैदानाला भेट देऊन या मैदानाचे सौंदर्यीकरण व्हावे इशी इच्छा व्यक्त केली होती.

सोनसड्याचा ताबा फोमेंतोजवळ होता तो पालिकेने आपल्या ताब्यात घेतला. सोनसड्यावर सात बायोमिथेशन प्रकल्प उभारण्यासाठी ठराव मंजूर केला. सोनसड्यावर असलेल्या कचऱ्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी रेमिडिएशन सुरू केले. सुमारे ४० टक्के कचऱ्‍यावर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. पावसामुळे काम बंद ठेवण्यात आले होते. आता पुन्हा सुरू करण्यात आले आहे. पार्किंग प्रकल्पाचे कंत्राट घेण्यासाठी कंत्राटदार न मिळाल्याने काम सुरू करण्यात आले नाही अशी फातोर्डा भागातील सर्व नगरसेवकांची कामगिरी उत्कृष्ट असल्याचे प्रभुदेसाई यांनी सांगितले.

संबंधित बातम्या