रंगकर्मी धनंजय गाड केरकर यांचे कोरोनामुळे निधन

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर धनंजय गाड केरकर याना गेल्या २८ जुलै रोजी कोविड इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारांना साथ न दिल्याने त्यांनी कोविड इस्पितळातच अखेरचा श्‍वास घेतला. 

फोंडा: राज्य सरकारच्या माहिती खात्याचे अधिकारी तसेच फोंड्यातील एक उत्कृष्ट रंगकर्मी धनंजय शांबा गाड केरकर (वय ५७) यांचे आज (मंगळवारी) संध्याकाळी मडगाव येथील कोविड इस्पितळात उपचार घेत असताना निधन झाले. 

धनंजय गाड केरकर हे मूळ केरीचे असले तरी त्यांचे वास्तव्य वरचा बाजार - फोंडा येथे होते. माहिती खात्याचे अधिकारी असलेले धनंजय केरकर हे मितभाषी व सुस्वभावी म्हणून परिचीत होते. कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना गेल्या २८ जुलै रोजी कोविड इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारांना साथ न दिल्याने त्यांनी कोविड इस्पितळातच अखेरचा श्‍वास घेतला. 

एक उत्कृष्ट रंगकर्मी म्हणून धनंजय केरकर यांची सबंध गोव्याला ओळख आहे. विविध नाटकांत भूमिका साकारण्याबरोबरच लघुपट, चित्रपट, मालिकांत त्यांनी उत्कृष्ट कला सादर केली होती. फोंड्यातील एक ज्येष्ठ निर्माते मिलिंद म्हाडगूत यांच्या सोळा चित्रपटात त्यांनी नायकाची भूमिका साकारली होती. याशिवाय एका मालिकेमध्येही त्यांनी अदाकारी दाखवली होती. त्यांच्या पश्‍चात पत्नी कवयित्री वरदा, तसेच दोन कन्या व एक पुत्र असा परिवार आहे. अंत्यसंस्कार रात्री करण्यात आले. 

दरम्यान, फिल्म मेकर्स या संघटनेतर्फे तसेच फोंड्यातील विविध संस्था, संघटनांनी व माहिती खात्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी धनंजय गाड केरकर यांच्या अकाली निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. फिल्म मेकर्सचे निर्माते, दिग्दर्शक मिलिंद म्हाडगूत यांनी एका चांगल्या कलाकाराला मुकलो असल्याचे सांगून अशाप्रकारचा कलाकार होणे नाही, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या