धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळवून देणार: चंद्रकांत कवळेकर

प्रतिनिधी
बुधवार, 9 सप्टेंबर 2020
उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांची माहिती

पणजी: धनगर समाजाला अनुसुचित जमातीचा दर्जा मिळावा यासाठी आता केंद्र व राज्य यांच्यातील समन्वयासाठी एन. डी. अगरवाल या माजी सनदी अधिकाऱ्याला समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या दर्जासाठी पुन्हा नेटाने प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत. त्यामुळे धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळवून देणार असून, आताच्या प्रयत्नांना यश येईल, असे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी सांगितले.

ते गेली अनेक वर्षे धनगर समाजाला हा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करत आहेत. पूर्वी ते विरोधी पक्षात होते तर आता ते उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी याखेपेला यासाठी नेटाने प्रयत्न करण्याचे ठरवले आहे. त्यांनी याबाबत सांगितले, की गाकुवेध ही संघटना यासाठी स्थापन करण्यात आली होती. गाकुवेध म्हणजे गावडा, कुणबी, वेळीप आणि धनगर. यापैकी उर्वरीत तीन समाज अनुसुचित जमाती म्हणून गणले गेले आणि केवळ धनगर समाजाचा समावेश अनुसुचित जमातींत झाला नाही. धनगर समाजावर अनेक वर्षे अन्याय होत आला आहे.

अनुसुचित जमातीत २००३ मध्ये तीन समाजांचा समावेश झाला. प्रत्येक सरकारने धनगर समाजाला अनुसुचित जमातीचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न केले. चार वेळा अहवाल करूनही यश मिळाले नाही. विधानसभेत मी सातत्याने हा विषय मांडत आलो आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे याविषयी सविस्तर चर्चा केली. समाजकल्याणमंत्री मिलींद नाईक यांनीही सहकार्य करण्याचे मान्य केले. हे काम मार्गी लावण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीची नियुक्ती करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी माजी सनदी अधिकारी एन. डी. अगरवाल यांची नियुक्ती सहा महिन्यांसाठी करण्यात आली आहे. ते आता राज्य व केंद्र सरकारातील दुवा म्हणून काम करतील. अगरवाल यांनी या विषयावर काम केले होते आणि ते समाजकल्याण संचालकही होते. त्यामुळे त्यांना या कामासाठी नेमण्याचे ठरवले. goa

संबंधित बातम्या