साखळी: नगराध्यक्षांनी ऑफिसला ठोकलं टाळं; नगरपालिकेत हाय होल्टेज ड्रामा

Sankhali.jpg
Sankhali.jpg

पणजी: साखळीचे नगराध्यक्ष यशवंत माडकर यांनी अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर नियमानुसार पदाचा ताबा उपनगराध्यक्षांकडे सोपवलेला नाही. त्यांनी आपला कक्ष कुलूपबंद केला आहे. याविषयी पालिका प्रशासन खात्याकडे सोमवारी दाद मागण्यात येईल, असे नगरसेवक धर्मेश सगलानी यांनी आज येथे सांगितले. (Dharmesh Sagalanis serious allegations against the Chief Minister Pramod Sawant)

कॉंग्रेस हाऊस येथे पत्रकार परिषदेत ते म्हणाले, अविश्वास ठराव टाळण्यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न सरकारी आशीर्वादाने करण्यात आले. आज साखळीत काही नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत या साऱ्या घडामोडींमागे मुख्यमंत्र्यांचा हात नाही, असे सांगण्याचा प्रयत्न केला. जर मुख्यमंत्र्यांचा यात हात नाही, तर बेकायदा वागलेल्या आणि उच्च न्यायालयाने त्यावर बोट ठेवलेल्या नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांचा राजीनामा घेण्याची हिंमत मुख्यमंत्री दाखवतील का? त्यांनी तसे केल्यास मुख्यमंत्री पक्षपाती वागले नाहीत, त्यांनी सरकारी यंत्रणेचा पुरेपुर गैरवापर केला नाही, असे म्हणता येईल. मुख्यमंत्री तसे करणार नसल्याने त्यांनी याची जबाबदारी घेतलीच पाहिजे. 

सगलानी (Dharmesh Saglani) म्हणाले, 2013 पासून 7 वर्षे मी नगराध्यक्ष होतो. त्या काळात पालिकेचे मुख्याधिकारी, लेखाधिकारी, अभियंता बदलत ठेवले. त्यामुळे पालिका मंडळाने घेतलेल्या ठरावांची अंमलबजावणी करता येत नव्हती. अखेर उच्च न्यायालयात दाद मागून आठवड्यातून किमान दोन दिवस मुख्याधिकारी उपलब्ध करण्याचा आदेश मिळवला. पालिका ब वर्गीय करण्यासाठी 11 ते 13 प्रभाग केले. उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी मुख्याधिकारी हवा असताना त्याखालील अधिकारी नेमला. नगरसेवकाच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. अविश्वास ठरावावर बैठक वेळेत बोलावली नाही. या साऱ्यांविरोधात वेळोवेळी न्यायालयात जावे लागले आहे. यामुळे जनतेची कामे खोळंबली आहेत. माझ्याविरोधात अविश्वास ठराव संमत झाल्यानंतर मी लगेच ताबा उपनगराध्यक्षांकडे दिला होता, आताही त्याचे पालन झाले पाहिजे. नगरसेवक राजेश सावळ म्हणाले, मी नगरसेवक होण्यापूर्वी घेतलेला भूखंड भाच्याला नगरसेवक होण्यापूर्वीच भाडेपट्टीवर दिला. मात्र नगरसेवक झाल्यानंतर मी विरोधात गेल्याने मला त्याआधारे अपात्र ठरवण्यासाठी जंग जंग पछाडण्यात येत आहे.

भाजपमध्ये (BJP) सध्या हुजऱ्यांचे चालते, तेथे शेपटी हलवत रहावे लागते. हे असह्य झाल्याने मी भाजप पक्ष सोडला. डॉ. सावंत (Pramod Sawant) हे मुख्यमंत्री होण्याआधी मी पक्ष सोडला होता. मला आता भूखंड, बंगला, सदनिका, किती रक्कम हवी अशी विचारणा तर झालीच याशिवाय अन्य नगरसेवक  राया पार्सेकर घरी नसताना नोटीस चिकटवून तुझ्या मुलाची नोकरी जाईल असे त्यांच्या वृद्ध आईला धमकावण्यात आले. जनतेने आता अशा प्रवृत्तींना इतरत्र मतदान करायचे का याचा निर्णय करावा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com