फोंड्यातील ढवळी मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये
The Dhavali area in Fonda was declared as a micro containment zone by the South Goa District Collector

फोंड्यातील ढवळी मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये

फोंडा: राज्यात कोरोनाचे रुग्ण घटत असतानाच आता पुन्हा एकदा रुग्णवाढीने उचल खाल्ल्याने लोकांत धास्ती पसरली असून फोंड्यातील ढवळी येथे एकाच दिवसात अठरा कोरोना रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. ढवळी येथील मातृछायेतील विद्यार्थिनी कोविड पॉझिटिव्ह सापडल्याने खबरदारी उपाय म्हणून दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी हा परिसर मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. 

दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती रुचिका कटयाळ यांनी हा आदेश काढला असून सर्व सरकारी यंत्रणांना आवश्‍यक सहकार्याचे आदेश देण्यात आले आहेत. मातृछायेतील मुले कोरोनाग्रस्त झाल्याचे समोर आल्यानंतर येथील कर्मचारी तसेच तळावली येथील बालकल्याण आश्रमातील मुलांची तपासणी करण्यात आली आहे. कोरोना सापडलेली जास्तीत जास्त मुले ही लक्षणेविरहित असून केवळ काळजी घेण्याची गरज आहे. मात्र कोरोनाचा फैलाव अधिक होता कामा नये यासाठी हा परिसर मायक्रो कंटेन्मेंट झोन करण्यात आला आहे. मुले कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने कवळेतील एक विद्यालयही बंद करण्यात आले आहे. 

सकाळी फोंड्याचे मामलेदार तसेच अन्य अधिकाऱ्यांनी ढवळी परिसराला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. स्थिती नियंत्रणात असून कुणीही धास्ती बाळगण्याचे कारण नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. चौदा दिवसांसाठी हा परिसर निगराणीखाली असेल, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, शाळा व्यवस्थापन व कवळे पंचायतीनेही ग्रामस्थांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन केले आहे. 

फोंड्यात वाढतोय कोरोना
फोंडा तालुक्‍यात कोरोना रुग्ण वाढू लागले आहेत. सुरवातीला एक, दोन असे सीमित असलेले रुग्ण आता दहाच्यावरती गेले आहेत. एकाच दिवसात ढवळी येथे अठरा रुग्ण सापडल्याने आता लोकांनी खबरदारी घेण्याची आवश्‍यकता आहे. यापूर्वी बांदोडा व रामनाथी परिसरात तीन कुटुंबे कोरोनाच्या घेऱ्यात सापडली होती. खानावळीशी संबंधित ही कुटुंबे असून पर्यटक व भाविकांमुळेच कोरोनाचा शिरकाव या कुटुंबात झाल्याचा कयास व्यक्त करण्यात येत आहे. 

आठ महिन्यानंतर पुन्हा "कंटोनमेंट झोन''
गेल्या मार्चमध्ये कोरोनासाठी लॉकडाऊन झाल्यानंतर राज्यातील विविध भागात कंटोनमेंट झोन जाहीर करण्यात आले. दिवाळीनंतर रुग्णसंख्या घटल्याने लोकांना हायसे वाटले होते, त्यामुळे कोरोनाची धास्तीच लोकांनी मनातून काढून बेजबाबदारपणे वागायला सुरवात केली. पर्यटकांना खुलेआम शिरकाव त्यातच मास्क, सामाजिक अंतराचा फज्जा, कार्यक्रमांना मोठी उपस्थिती असे प्रकार घडल्यामुळे आता कोरोनाचा फैलाव व्हायला सुरवात झाली असून केवळ खबरदारी हाच त्यावर उपाय असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com