ढवळीकर ट्रस्टतर्फे मडकईत कोविडसंबंधी आरोग्य तपासणी

प्रतिनिधी
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

कोरोनाची महामारी राज्याला सतावत असताना लोकांच्या मनात भीती निर्माण झाली असून वाढत्या कोरोना रुग्णांचे निदान लवकर व्हावे आणि लोकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी मडकईतील माधवराव ढवळीकर ट्रस्टने पुढाकार घेतला आहे. 

फोंडा: कोरोनाची महामारी राज्याला सतावत असताना लोकांच्या मनात भीती निर्माण झाली असून वाढत्या कोरोना रुग्णांचे निदान लवकर व्हावे आणि लोकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी मडकईतील माधवराव ढवळीकर ट्रस्टने पुढाकार घेतला आहे. 

आमदार सुदिन ढवळीकर व माधवराव ढवळीकर ट्रस्टने कोरोनासंबंधी मडकई मतदारसंघातील सर्व पंचायतींमध्ये नागरिकांची ही तपासणी करण्यात येत असून त्यात रक्तदाब, मधुमेह तसेच शरीरातील प्राणवायूचा पुरवठा यासंबंधीची तपासणी करून कोरोनासंबंधी शंका आल्यास त्यांना इस्पितळात पाठवण्यात येणार आहे. या आरोग्य मोहिमेचा शुभारंभ आज (गुरुवारी) बांदोडा पंचायतीपासून सुरू झाला. 

धोणशी - नागेशी येथे सुरू झालेल्या या आरोग्य शिबिराचे उद्‌घाटन आमदार सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते समई प्रज्वनाने झाले. यावेळी बांदोडा सरपंच रामचंद्र नाईक, उपसरपंच सलोनी गावडे, पंच वामन नाईक, अजय नाईक, कविता नाईक तसेच माधवराव ढवळीकर ट्रस्टचे मिथिल ढवळीकर आदी उपस्थित होते.  
हे शिबिर मडकई मतदारसंघातील सर्व पंचायतक्षेत्रात टप्प्याटप्प्याने घेण्यात येणार असून नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार सुदिन ढवळीकर यांनी केले आहे.  

कोरोनाच्या काळात आयोजित या शिबिराला मडकई मतदारसंघातील सर्व पंचायती, सरपंच, उपसरपंच, पंच तसेच मगो कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले असल्याचे सुदिन ढवळीकर यांनी नमूद केले. ढवळीकर ट्रस्टतर्फे मिथिल ढवळीकर, मिलिंद सावईकर व साई नाईक यांच्यातर्फे या उपक्रमाचा पाठपुरावा करण्यात येत असून नागरिकांच्या आरोग्यासाठी आवश्‍यक ती खबरदारी ढवळीकर ट्रस्टमार्फत घेण्यात येत असल्याचे सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. राज्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी कोविडग्रस्तांना विविध साहित्याचा खास "कीट'' सरकारतर्फे देण्यात येणार असल्याचे जाहीर केल्याने, हा कीट देण्यापेक्षा राज्यात विविध पंचायती, पालिकांमध्ये जर आरोग्य तपासणी घेऊन एखाद्याला कोरोनासंबंधी जर काही लक्षणे असतील, तर त्यांना तात्काळ सेवा देणे शक्‍य होणार असल्याचे नमूद केले व अशा उपक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. शिबिर संचलन परिचारिकेचे प्रशिक्षण घेतलेल्या युवती तसेच परिचारिकांतर्फे करण्यात आले. 

सरपंच रामचंद्र नाईक यांनी आमदार सुदिन ढवळीकर व माधवराव ढवळीकर ट्रस्टमार्फत सुरू केलेल्या मोफत तपासणी मोहिमेचे स्वागत करून आमदारांकडून मतदारसंघाच्या विकासकामांत तसेच नागरिकांच्या हितासाठी अनेक उपक्रम राबवले जात असून मडकई मतदारसंघातील या उपक्रमांबाबत त्यांनी आमदारांचे आभार मानले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन उपसरपंच सलोनी गावडे यांनी 
केले.
 

संबंधित बातम्या