ढवळीकरांनी स्वतःच्या फायद्यासाठी कर्ज वाढविले

dainik Gomantak
मंगळवार, 30 जून 2020

म्हार्दोळ येथील व्हीपीके अर्बन को-ऑपरेटीव्ह सोसायटीच्या २०१३ मध्ये झालेल्या २० वर्धापनदिनी २५ लाखांवरून ६० लाखांपर्यंत कर्ज देण्याची मर्यादा वाढविण्यात आली. ही कर्ज मर्यादा कोणाच्या फायद्यासाठी वाढविण्यात आली, हे दीपक ढवळीकर यांच्या घरातील सदस्यांच्या नावे घेतलेल्या कर्ज रकमेवरून स्पष्ट होते. ही सोसायटी अडचणीत आली, तर कोणाला फायदा होणार आहे, हे लपून राहत नाही. त्यामुळे सोसायटीच्या संचालक मंडळाने पुढे येऊन झारीतील शुक्राचार्य कोण, हे जाहीर करावे, असे आवाहन सहकारमंत्री गोविंद गावडे यांनी केले.

पणजी
गावडे यांनी सांगितले की, ज्यांनी या सोसायटीविरुद्ध तक्रार दिली आहे, ते ज्येष्ठ माजी संचालक दामोदर अनंत म्हार्दोळकर आहेत. या सोसायटीवर सहकार निबंधकांनी (आरसीएस) जे निर्बंध घातले आहेत, ते तात्पुरत्या स्वरुपाचे आहेत. तरीही सध्या बिनबुडाचे आरोप होत आहेत. २२ डिसेंबर २०१३ रोजी झालेल्या व्हीपीकेच्या २० व्या वर्धापनदिनी म्हार्दोळ येथे तत्कालीन सहकारमंत्री दीपक ढवळीकर यांनी २५ लाखांवरून ६० लाखांपर्यंत कर्जमर्यादा वाढवावी, असे सांगितले होते. त्यावेळी सहकारी निबंधक जे. बी. भिंगी, फोंड्याचे सहायक निबंधक व्ही. बी. देविदास यांचीही उपस्थिती होती. आपणही त्या कार्यक्रमास उपस्थित होतो. त्यामुळे दुसऱ्याकडून ऐकले नाही.
ते पुढे म्हणाले की, व्हीपीकेच्या संचालक मंडळाला कारणे दाखवा नोटीस बजावली होती, तेव्हा सोसायटीने लिहून देताना कर्जमर्यादा कोणाच्या सांगण्यावरून वाढविली आहे, ते स्पष्टपणे लिहून दिले आहे. यापुढे सुवर्णा संदीप ढवळीकर, संदीप माधव ढवळीकर, दीपक ढवळीकर, लता दीपक ढवळीकर, विराज दीपक ढवळीकर आणि त्यांच्याच कार्यालयातील कारकून सचिता बांदोडकर या सर्वांच्या नावे प्रत्येकी ६० लाखांचे कर्ज काढण्यात आले आहे. वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात तत्कालीन सहकारमत्री ढवळीकर जे बोलले ते व्हीपीकेच्या कल्याणासाठी नव्हे, तर कुटुंबाचे भले करण्यासाठी, हे लक्षात घ्यावे. त्यांना जे कर्ज दिले आहे, ते त्यांच्या मर्जीतील संचालक असल्यामुळेच वितरित करण्यात आले आहे. याच गोष्टीवरून ‘शुक्राचार्य’ कोण हे लक्षात येते.

‘चौकशीअंती खरे शुक्राचार्य समजेलच’
व्हीपीकेच्या संचालकांनी पुढे येऊन खरा शुक्राचार्य कोण आहे, हे जाहीर करावे. कारण जर ढवळीकर शुक्राचार्य नसतील, तर संचालकांनी पत्रकार परिषद घेऊन ते सांगावे. जर संचालक गप्प राहिले, तर ढवळीकर हेच शुक्राचार्य आहेत, हे आपले म्हणणे आहे. त्याचा पुरावा संचालक मंडळाने सह्यानिशी सहकार खात्याकडे दिला आहे. कारण त्यावेळी मंत्री गावडे नव्हते, तर ढवळीकर होते, हे लक्षात घ्यावे. गोमंतकीयांची दिशाभूल करतात, त्या गोष्टी जनतेने लक्षात घ्याव्यात. चौकशीअंती कोण शुक्राचार्य आहे, हे समोर येईलच. आपले पाप लपविण्यासाठी खोटी माहिती वर्तमानपत्रांना दिली जात आहे, असा आरोपही गावडे यांनी केला.

Goa Goa Goa Goa Goa

संबंधित बातम्या