धुमासे येथील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी ३० वर्षे प्रतीक्षा..!

वृत्तसंस्था
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

साळ - धुमासे रस्त्यासाठी जमीन गेलेल्या धुमासे येथील शेतकऱ्यांना गेली ३० वर्षे झाले, तरी अद्याप नुकसान भरपाई मिळत नसल्याने शेतकऱ्यांत नाराजी व्यक्त होत आहे.

साळ: साळ - धुमासे रस्त्यासाठी जमीन गेलेल्या धुमासे येथील शेतकऱ्यांना गेली ३० वर्षे झाले, तरी अद्याप नुकसान भरपाई मिळत नसल्याने शेतकऱ्यांत नाराजी व्यक्त होत आहे. सध्या या रस्त्याची डागडुजी, रुंदीकरण वारंवार होत आहे. हॉटमिक्स डांबरीकरणावेळी आमदार येऊन शेतकऱ्यांना भेटतात, नुकसान भरपाई मिळेल म्हणून, पण अद्याप या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत संताप व्यक्त होत आहे.

साळ - धुमासे रस्ता करताना शेतकऱ्यांना सुपीक जमिनी व उत्पन्न देणारी काजू, आंबा, कोकम व फणसाची झाडे गमवावी लागली, पण आजपावेतो नुकसान भरपाई मिळाली नाही. रस्ता होऊन तीस वर्षे उलटले, तरी त्याचा मोबदला सरकारने दिला नाही. माजी मंत्री पांडुरंग राऊत यांनी आपल्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत प्रयत्न केले होते, पण झालेल्या सतांत्तरामुळे हे काम अडकून पडलेले आहे. त्यानंतर आलेल्या आमदारांनी, मंत्र्यांनी फक्त आश्वासने दिली, असा आरोप शेतकरी करत आहेत.

नुकसान भरपाई देण्याच्या दिरंगाईबद्दल सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ता बांधकाम विभागाकडे चौकशी केली असता भूसंपादन कायद्याच्या कलम  ४ नुसार भूसंपादन करण्यासंबंधीचे सोपस्कार पूर्ण झाले आहेत, पण कलम ६ नुसार भूसंपादन करून रस्त्यासाठी वापरात आलेल्या जमिनीची मोजणी करण्याचे सोपस्कार पूर्ण झाल्यावरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात सोपस्कार लगेच केले जाणार असल्याचे सांगितले जाते. गेली पंचवीस-तीस वर्षे संबंधित खात्याकडून हेच रडगाणे चालू आहे. नुकसान भरपाईसंदर्भातील सरकारची अनास्था असल्याचे दिसते. या वेळकाढू धोरणामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची चिन्हे काही दिसत नाही.

मोप विमानतळ होत असल्याने प्रवाशांच्या वाहतुकीसाठी योग्य रस्त्यांची गरज असल्याने याही रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत होते, त्यावेळी जमीन गेलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या क्षेत्रातील रूंदीकरण बंद पाडले. तो रस्ता आहे तसाच आहे. गोवा सरकारच्या रस्ता बांधकाम खात्याने ना चौकशी केली, ना उपाययोजना केली.

नुकसानग्रस्त शेतकरी स्व. लाडू राऊत यांनी आपल्या हयातीत व इतर शेतकऱ्यांनी वारंवार या संबंधित विभागाकडे चौकशी केली व करीत आहेत. मार्च २०१३ मध्ये  खोलपे येथील रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण करताना माजी आमदार सावळ त्यावेळी आमदारपदी असताना अधिकाऱ्यांना स्पष्ट सांगितले, की  रस्त्याचे पुन्हा डांबरीकरण करण्याअगोदर शेतकऱ्यांना व्याजासह रक्कम घ्यावी. त्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण करावे, पण हाती काहीच लागले नाही. संबंधित शेतकऱ्यांनी एप्रिल २०१६ मध्ये रस्त्याला विरोध केला. त्यामुळे आमदारांनी अधिकाऱ्यांसमोर मध्यस्थी केली, पण आज कित्येक वर्षे उलटून गेली तरी नुकसान भरपाई मिळण्याची चिन्हे दिसत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी न्यायालयाच्या दरवाजा ठोठावण्याचे ठरविले आहे. तसेच विद्यमान सभापती व डिचोली मतदारसंघाचे आमदार राजेश पाटणेकर यांना याची पूर्ण कल्पना असल्याने त्यांनीही नुकसान भरपाई देण्याचे शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व सभापती राजेश पाटणेकर यांनी योग्य ती हालचाल करून संबंधित खात्याचे मंत्री यांच्याशी विचारविनिमय करून या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

संबंधित बातम्या