डिचोलीतील सेझा कामगार संघटनेकडून कामगाराच्या कुटुंबाला आर्थिक मदत

प्रतिनिधी
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

डिचोलीतील सेझा (वेदांता) कामगार संघटनेकडून अलीकडेच निधन झालेले पिळगाव येथील सहकारी कामगार एकनाथ च्यारी यांच्या कुटुंबाला ३.३६ लाख रुपये सानुग्रह आर्थिक मदत करण्यात आली आहे.

डिचोली: डिचोलीतील सेझा (वेदांता) कामगार संघटनेकडून अलीकडेच निधन झालेले पिळगाव येथील सहकारी कामगार एकनाथ च्यारी यांच्या कुटुंबाला ३.३६ लाख रुपये सानुग्रह आर्थिक मदत करण्यात आली आहे. बुधवारी (ता. १६) न्यू वाडा-पिळगाव येथे मयत च्यारी यांच्या घरी जाऊन कामगारांचे कायदा सल्लागार ॲड. अजय प्रभुगावकर, सेझा कामगार संघटनेचे अध्यक्ष निलेश कारबोटकर, सचिव किशोर लोकरे, खजिनदार नारायण गावकर, अनिल सालेलकर आदींच्या उपस्थितीत मयत च्यारी यांच्या पत्नी एकता च्यारी यांच्याकडे आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

यावेळी दीपक पोपकर, राजेश गावकर, महेश होबळे, बाबुसो कारबोटकर, मयत च्यारी हे सेझा खाण कंपनीत फिटर म्हणून कामाला होते. दोन महिन्यापूर्वी मागील जुलै महिन्यात त्यांचे अकाली निधन झाले आहे. त्यांच्या कुटुंबाला आधार व्हावा, या दृष्टिकोनातून कामगारांनी आपल्या वेतनातील काही भाग गोळा करून ही मदत दिली आहे.  खाण बंदीमुळे सेझाच्या कामगारांना अर्धे वेतन मिळत आहे. तरीदेखील ''कोविड'' महामारीच्या संकट काळात कामगारांनी सहकारी कामगाराच्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात देऊन सामाजिक बांधीलकी जपली आहे. यावरून कामगारांना एकमेकांबद्‌दल सहानुभूती आणि त्यांच्यात एकजूट असल्याचे दिसून येते. असे गौरवोद्‌गार ॲड. अजय प्रभूगावकर यांनी यावेळी बोलताना काढले. आर्थिकरुपाने मदतीचा हात दिल्याबद्‌दल एकता च्यारी हिने कामगारांना धन्यवाद दिले. 

संबंधित बातम्या