दिवाळीत मिठाईचे चाहते गावठी पोह्याच्या आठणीत

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

काही वर्षापुर्वी डिचोलीत गावठी पोहे कांडण्याच्या गिरणी कार्यरत होत्या. त्याकाळी दिवाळीला साधारण पंधरा दिवस असताना खास करुन ग्रामीण भागातील नागरीक पोहे कांडण्यासाठी भात घेवून गिरणीवर यायचे

डिचोली ; दिवाळीला अवघेच दोन दिवस असल्याने सगळीकडे दिवाळी सणाच्या तयारीची लगबग सुरु असून, डिचोली बाजारपेठही आता तयार पणत्या, आकाशकंदील, पोहे आदी दिवाळीच्या साहित्याने सजली आहे. मिठाईची दुकानेही विविध प्रकारच्या मिठाईने सज्ज आहेत. एका बाजूने "कोविड" संकटाचे सावट असले, तरी दुसऱ्याबाजूने सर्वत्र दिवाळी सणाचा उत्साह संचारल्याचे दिसून येत आहे. आज बुधवारी साप्ताहीक बाजाराच्या दिवशी तर डिचोलीत दिवाळीच्या साहित्य खरेदीला जोर आला होता. दिवाळीच्या उत्साहात ग्राहकांकडून सामाजिक नियमांकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.  

गावठी पोहे बाजारात!
काही वर्षापुर्वी डिचोलीत गावठी पोहे कांडण्याच्या गिरणी कार्यरत होत्या. त्याकाळी दिवाळीला साधारण पंधरा दिवस असताना खास करुन ग्रामीण भागातील नागरीक पोहे कांडण्यासाठी भात घेवून गिरणीवर यायचे.  मात्र कालांतराने गावठी पोहे कांढण्यासाठी प्रतिसाद कमी झाल्याने हा व्यवसाय बंद पडला. 

काही ग्रामीण भागातही पारंपरिक पध्दतीने पोहे कांडण्यात येत होते. मात्र, तो प्रकारही आता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यामुळे बाजारात येणाऱ्या पोह्यांना चांगले दिवस आले आहेत. महाराष्ट्रातील काही भागातून अद्याप मोठ्या प्रमाणात नसले, तरी गावठी पोहेही सध्या बाजारात विक्रीस उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे. यंदा गावठी आणि अन्य जातीचे पोहे ५० रु. किलो या दराने विकण्यात येत आहेत. गोडे आणि फुलविलेले पोहेही बाजारात उपलब्ध झाले आहेत. शहरातील कुंभारवाड्यावरील पणती व्यवसाय बंद झाल्यापासून बाजारात खानापूर आणि राजस्थानमधील डिझाईनच्या पणत्यांची चलती होत आहे. अद्याप मोठ्या प्रमाणात या पणत्या बाजारात दाखल झालेल्या नाहीत. 

मिठाई दुकाने सजताहेत!
दिवाळी म्हणजे गोड-धोड फराळांचा सण. घराघरातून दिवाळीचा फराळ करण्याचे प्रमाण कमी झाल्याने दिवाळी काळात मिठाईला प्रचंड मागणी असते. त्यामुळे आता मिठाईची दुकानेही चिवडा, चकली, बर्फी, हलवा, सोनपापडी, पेढे, रसगुल्ला, कुंदा आदी मिठाईने सजू लागली आहेत. मिठाईच्या दुकानांतून खास काजू बर्फीही उपलब्ध झाली आहे. स्वयंसाहाय गटाच्या महिलांनीहीही चकल्या, लाडू, चिवडा, करंज्या आदी खाद्यपदार्थ बनवले असून विविध ठिकाणी स्टॉल थाटून त्यांची विक्री चालू आहे. काही दुकानांतूनही हे खाद्यपदार्थ विक्रीस उपलब्ध झाले आहेत. दिवाळी म्हटल्याबरोबर रेडीमेड कपड्यांची दुकानेही सजली असून, ही दुकाने ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. 

आकाशकंदीलांना मागणी! 
दरवर्षीप्रमाणे यंदाही बाजार तसेच शहरात मोठ्या प्रमाणात पारंपरिक आकाशकंदील विक्रीस उपलब्ध झाले आहेत. शहरातील काहीजण पारंपरिक आकाशकंदील बनवतात. यंदाही डिचोलीतील विविध कलाकारांनी तयार केलेले हे आकाशकंदील बाजारात विक्रीस उपलब्ध आहेत. बाजारपेठेसह  शहरातील विविध रस्त्यांच्या बाजूने या आकाशकंदील विक्रीस ठेवण्यात आले आहेत. शहरातील राजेश गावठणकर आदी कलाकारांनी मिळून यंदाही दोन हजाराहून अधिक पारंपरिक आकाशकंदील तयार केले असल्याचे समजते. बहूतेक नागरीकांची पारंपरिक आकाशकंदीलांना पसंती असल्याने या आकाशकंदिलांना मागणी आहे. आकाराप्रमाणे 200 ते 500 रु. एक याप्रमाणे आकाशकंदिलांची विक्री होत आहे.

संबंधित बातम्या