
मडगाव : नामवंत शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील गोवा गोल्डन ज्युबिली काउन्सिलने तयार केलेल्या गोवा व्हिजन 2035 अहवालातील भगवान परशुरामांच्या सात बाणांच्या प्रेरणेतून अधोरेखित केलेल्या 7 धोरणांची त्वरित कार्यवाही करणे ही काळाची गरज आहे, असं वक्तव्य मडगावचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी केलं आहे.
आज अक्षय्य तृतिया, इद उल फित्र तसेच परशुराम जयंतीच्या निमित्ताने गोमंतकीयांना शुभेच्छा देताना दिगंबर कामत यांनी सुरम्य, सुसंस्कृत, संतुलित, सुविद्य, समृद्ध, सुशासित आणि स्वानंदी गोवा करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे.
जगभरात विविध क्षेत्रात नाव मिळविलेल्या जाणकारांनी तयार केलेल्या गोवा व्हिजन 2035 च्या मुखपृष्ठावर, कॅनडात स्थायिक झालेले गोमंतकीय चित्रकार मेल डिसोझा यांनी फादर नासिमेंत मास्कारेन्हस यांच्या एका पुस्तकात काढलेले भगवान परशुरामांचे रेखाचित्र असल्याचा ज्येष्ठ काँग्रेस नेते दिगंबर कामत यांनी आवर्जून उल्लेख केला.
गोवा मुक्तीच्या पन्नासाव्या वर्षी गोवा गोल्डन ज्युबिली डेव्हलपमेंट काउन्सिलची स्थापना करण्याचे भाग्य मला लाभले. विविध क्षेत्रातील जाणकारांचा समावेश असलेल्या या मंडळात डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भाटकर, डॉ. अनिल काकोडकर, आर्किटेक्ट चार्लस कुरैया, प्रा. माधव गाडगीळ, डॉ. लिजीया नोरोन्हा, अशांक देसाई, डॉ. विजय केळकर, प्रा. एरल डिसोझा, प्रा. विठ्ठल सुखटणकर, डॉ. प्रेमानंद रामाणी, प्रा. दिलीप देवबागकर, डॉ. सतीश शेट्ये आणि राज पारोडा तसेच इतर मान्यवरांचा समावेश होता. गोव्याची परंपरा व आधुनिकता यांचा मेळ घालून गोव्याच्या विकासाचे धोरण या अहवालात तयार करण्यात आले, असे दिगंबर कामत म्हणाले.
गोवा व्हिजन 2035 अहवालात गोमंतकीयांच्या बहुसांस्कृतिक, शांतताप्रिय तसेच लढवय्या स्वभाव वैशिष्ट्यांचा उल्लेख करण्यात आला असून, दूरदृष्टीचा विचार करुन या प्रांताच्या भवितव्याचा विचार करण्याचे सामर्थ्य गोमंतकीयांमध्ये असल्याचे या अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे, असे दिगंबर कामत यांनी नमुद केले.
आपण आता गोवा हे एक आदर्श राज्य करण्यासाठी काम करणे गरजेचे आहे. आपली प्राथमिकता आणि प्राधान्यक्रम ठरवून योग्य दिशादर्शकाच्या आधारे आता वाटचाल करणे गरजेचे असून, नाहक वाद उकरुन न काढता, राज्यातील धार्मिक सलोखा, परंपरा आणि वारसा जपण्यासाठी सगळ्यांनी वावरणे गरजेचे आहे, असे दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.