Digambar Kamat : दिगंबर कामतांचा उपमुख्यमंत्रिपदावर दावा!

मोठे पद प्राप्त होणार : कामतांचा समर्थक नगरसेवकांना इशारा
Digambar Kamat
Digambar KamatDainik Gomantak

Digambar Kamat : काँग्रेसमधील आठ जणांच्या फुटीर गटाला घेऊन दिल्लीत जाण्याचा कार्यक्रम अद्याप निश्चित झालेला नसला तरी दिगंबर कामत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटून आल्यानंतर आपल्याला मोठे पद देऊ करण्यात आल्याचे समर्थक नगरसेवकांना सांगत आहेत. कामत यांना पाठिंबा असलेल्या नगरसेवकांबरोबर ते सतत संपर्कात असले तरी या 15 जणांच्या गटात अजूनही चलबिचल कायम आहे.

कामत यांनी नगराध्यक्ष घन:श्याम शिरोडकर यांच्याविरोधात अविश्वासाच्या ठरावावर सह्या केल्यानंतर हा ठराव पालिका प्रशासनाला सोमवारी सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर आठवड्याभरात ठरावावर चर्चा अपेक्षित आहे. यादरम्यान कामत पंधराही नगरसेवकांना स्वतंत्रपणे भेटत असून आपल्याला उपमुख्यमंत्री पदाची ऑफर असल्याचे ते काही नगरसेवकांना सांगत आहेत. ‘मी सरकारमध्ये मोठ्या पदावर असेन. तुम्ही पालिकेत माझ्या बाजूने उभे राहिला नाहीत तर तुमची कोणतीही कामे होणार नाहीत, असेही कामत यांनी आक्रमकपणे काही नगरसेवकांना सुनावले आहे.’ अशी माहिती काही नगरसेवकांनी दिली.

शुक्रवारी कामत गट आणि भाजप पाठीराख्या नगरसेवकांची बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली. त्यावेळी कामत हे अत्यंत आक्रमकपणे या सदस्यांशी बोलले. ‘भाजप सरकारमध्ये माझे स्थान अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. तेव्हा तुमची कामे कशी होतील, ते मी पाहीन. तुम्ही अविश्वास ठरावाला पाठिंबा दिला नाही तर माझी दारे तुमच्यासाठी कायमची बंद असतील.’, असे खडे बोल कामत यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांना सुनावले.

Digambar Kamat
Goa MLA Couples : गोव्यात एकाच पक्षात तीन आमदार दाम्पत्ये

कामत आणि शहा यांची दीड तास चर्चा

भाजप सूत्रांच्या मते, कामत यांना एकट्यानेच दिल्लीला येण्याची सूचना अमित शहा यांनी केली होती. अमित शहा यांनी कामत यांच्याबरोबर रात्रीचे जेवणही घेतले. दोन्ही नेते सुमारे दीड तास एकमेकांसोबत होते. गोव्याच्या कोणत्याही नेत्याला अमित शहा यांनी एवढी वेळ क्वचितच दिली असेल. कामत यांना एकटे दिल्लीला बोलावून त्यांना शहा यांनी एवढा वेळ दिल्याची माहिती गोव्यात भाजप वर्तुळात त्वरित पसरली आणि काहीजण अस्वस्थही झाले. विश्वजीत राणे व अन्य काही ज्येष्ठ मंत्रांना आपली काही महत्त्वाची खाती जातील तसेच आपली क्रमवारी उतरेल, अशीही धास्ती वाटू लागली आहे.

लोबो आल्यानंतर दिल्ली भेट

भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांना विचारता ते म्हणाले, दिल्ली भेट अद्याप निश्चित झालेली नाही. या भेटीसंदर्भात दिल्लीकडून आमंत्रण येणार आहे. त्याची आम्ही वाट पाहात आहोत. दरम्यान, मायकल लोबो आपल्या मित्राच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेले असून पुढील दोन दिवसांत ते गोव्यात परतणार आहेत. त्यानंतरच दिल्ली भेट निश्चित होऊ शकेल, अशी माहिती मिळाली आहे.

दिवाळीपर्यंत मंत्रिमंडळ ‘जैसे थे’

भाजपच्या ज्येष्ठ सूत्रांनी सांगितले की, गोव्यातील सरकारमध्ये बदल करण्याचे कोणतेही सूतोवाच केंद्रीय नेत्यांनी केलेले नाही. दिवाळीपर्यंत येथे काही बदल केले जातील, अशी परिस्थिती आम्हाला वाटत नाही. पक्ष संघटनेतील एका ज्येष्ठ नेत्याच्या मते, लोकसभा निवडणुकीपर्यंत तरी गोवा मंत्रिमंडळात बदल करणे योग्य होणार नाही. परंतु काँग्रेसमधील असंतुष्टांना प्रवेश देण्यात दिल्लीतील नेत्यांचाच हातभार लागला आहे. त्यासंदर्भात अंतिम निर्णय झाल्यानंतर आम्हाला विश्वासात घेण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com