‘शिक्षण माध्यम अहवालावर धोरण जाहीर करा’: दिगंबर कामत

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

राज्यावर  दूरगामी परिणाम करू शकणाऱ्या विविध विषयांवर धोरण निश्चित करताना या विषयांचा अभ्यास व अनुभव असलेल्या तज्ज्ञांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करणे महत्वाचे आहे, असे माझे ठाम मत असल्याचे कामत यांनी म्हटले आहे.

मडगाव: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका राजकारण्याच्या अध्यक्षतेखाली राज्यातील उच्च शिक्षण धोरण ठरविण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे. या समितीचे कामकाज सुरू होण्यापूर्वी सरकारने प्राथमिक शिक्षणाचे माध्यम ठरविण्यासाठी स्थापन केलेल्या प्राचार्य भास्कर नायक समितीच्या अहवालावर आपले धोरण जाहीर करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे. 

राज्यावर  दूरगामी परिणाम करू शकणाऱ्या विविध विषयांवर धोरण निश्चित करताना या विषयांचा अभ्यास व अनुभव असलेल्या तज्ज्ञांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करणे महत्वाचे आहे, असे माझे ठाम मत असल्याचे कामत यांनी म्हटले आहे.  प्राथमिक शिक्षण हेच विद्यार्थ्यांच्या भवितव्याची दिशा ठरवीत असल्याने, उच्च शिक्षणाविषयी धोरण ठरविण्याच्या अगोदर, प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमावर सरकारने आपले मत जाहीर करणे गरजेचे आहे. गोवा सरकारने गोव्याच्या उज्वल भवितव्याचा विचार करून, पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश असलेल्या गोवा गोल्डन ज्युबली काऊंसिलने तयार केलेल्या व्हिजन-२०३५ अहवालाची ताबडतोब अंमलबजावणी करावी, अशी मागणी कामत यांनी परत एकदा मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या