दिगंबर कामत, डॉ. हेदे, डिसोझा निर्दोष मुक्त

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

खाणसंबंधी खटले हाताळण्यासाठी स्थापन केलेल्‍या विशेष न्यायालयात सुरू असलेल्या खाण लीज नूतनीकरणाच्या विलंबास माफी प्रकरणी संशयित असलेले मडगाव आमदार दिगंबर कामत, उद्योजक डॉ. प्रफुल्ल हेदे व अँथनी डिसोझा यांना आज मंगळवारी आरोप निश्चित होण्यापूर्वीच निर्दोष मुक्त करण्यात आले.

सासष्टी : खाणसंबंधी खटले हाताळण्यासाठी स्थापन केलेल्‍या विशेष न्यायालयात सुरू असलेल्या खाण लीज नूतनीकरणाच्या विलंबास माफी प्रकरणी संशयित असलेले मडगाव आमदार दिगंबर कामत, उद्योजक डॉ. प्रफुल्ल हेदे व अँथनी डिसोझा यांना आज मंगळवारी आरोप निश्चित होण्यापूर्वीच निर्दोष मुक्त करण्यात आले. तिघांनाही प्रत्येकी १५ हजार रुपयांची हमी, तितक्याच रकमेचा हमीदार सादर करण्याचा आदेश न्यायालयाने दिला. 

खाण लीज नूतनीकरणाच्या विलंबास माफी प्रकरण खनिज व खाण कायद्यांतर्गत येत असल्याने हे प्रकरण विशेष न्यायालयात वर्ग करण्यात आले होते, तर दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एडगर फर्नांडिस यांच्या विशेष न्यायालयात सदर प्रकरणाची सुनावणी सुरू होती. याप्रकरणी शासनातर्फे विशेष सरकारी वकील लवंदे यांनी बाजू मांडली तर संशयित प्रफुल्ल हेदे यांच्यावतीने ॲड. नाडकर्णी, अँथनी डिसोझा यांच्यावतीने ॲड. भांगी, दिगंबर कामत यांच्यावतीने ॲड. एस. देसाई व पराग राव यांनी बाजू मांडली. 

हेदे यांच्या कुळे येथील खाणीच्या लीज नूतनीकरणाच्या विलंबास नियम डावलून परवानगी दिल्याप्रकरणी क्राईम ब्रांचने अतिरिक्त सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात माजी मुख्यमंत्री व मडगावचे आमदार दिगंबर कामत, खाण उद्योजक प्रफुल्ल हेदे व खाण खात्याचे कर्मचारी अॅंथनी डिसोझा या तिघांविरुद्ध खाण कायदयाखाली कारस्थान रचणे, फसवणूक करणे व भ्रष्टाचार कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला होता.  गुन्हा अन्वेषण विभागाने तिन्ही संशयितावर १८ जानेवारी २०१८ रोजी सुमारे १५७२ पानांचे आरोपपत्र दाखल होते. विभागाने आरोपपत्राबरोबर सुमारे ५० साक्षीदारांची सूची जोडली होती. 

संबंधित बातम्या