Goa Politics: निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये गटबाजीला उधाण

Goa Politics: निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये गटबाजीला उधाण
Dinesh Gundu Rao

पणजी: आगामी विधानसभा निवडणुकीच्या(Assembly elections) पूर्वतयारीवरून राज्यात राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. पुढील व्यवस्थापनासाठी राज्याच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आलेले काँग्रेसचे(Congress) राज्य प्रभारी दिनेश गुंडू राव(Dinesh Gundu Rao) यांच्यासमोर पहिल्याच दिवशी पक्षातील गटबाजीचे नाट्य पाहायला मिळाले. संघटना बळकट करण्यासाठी नेते, कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आलेल्या राव यांना प्रदेशाध्यक्ष कोणाला करा, मुख्यमंत्री पदासाठी कोण योग्य हे ऐकावे लागले. हे सारे नाट्य गुरुवारी दुपारपासून मडगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयालगतच्या एका हॉटेलात रंगले. बैठक कक्षाबाहेर धक्काबुकीचा प्रकारही घडला. यावरून काँग्रेजजनांचा मूळ स्वभाव जाईना, असे दिसून आले. (Dinesh Gundu Rao accused the Congress of not trusting the minorities)

दाबोळी विमानतळावर दुपारी राव यांचे आगमन झाल्यानंतर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर दिवसभर हॉटेलमध्ये राव यांनी नेत्यांशी चर्चा केली. हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर राव यांच्यासमोर हा विषय मांडण्याआधी प्रदेश उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी प्रदेशाध्यक्षपदी गिरीश चोडणकर हेच हवेत, असे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले होते. त्याची माहिती राव यांना मिळाली होती. त्यामुळे आमोणकर व अन्य सहकारी यांनी राव यांच्या कक्षात पाऊल ठेवल्याबरोबर राव यांनी त्यांना पक्षशिस्तीचे खडे बोल सुनावले. पक्ष जो काही निर्णय घेईल त्याला सर्वांनी बांधील असले पाहिजे आणि जी काही मते मांडायची असतील, ती पक्षाच्या मंचावरच मांडावीत, असेही सुनावले.

भाजपवर शरसंधान
राव यांचे विमानतळावर आगमन होताच  त्यांनी भाजप सरकारवर शरसंधान केले. कोविड व्यवस्थापन करण्यात सरकारला अपयश आल्याने राज्याची अर्थव्यवस्था कोलमडली आणि बेरोजगारी वाढल्याचा आरोप त्यांनी केला. हे चित्र सुधारण्यासाठी विधानसभेच्या येत्या निवडणुकीत गोमंतकीय जनतेने भाजपला दूर लोटले पाहिजे, असेही मत त्यांनी व्यक्त केले. खासदार फ्रान्सिस सार्दिन, माजी केंद्रीय मंत्री ॲड. रमाकांत खलप, आमदार लुईझिन फालेरो, आलेक्‍स रेजिनाल्ड लॉरेन्स आदींना राव भेटणार आहेत. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com