फोंडा पालिकेत फोडाफोडीचे राजकारण- गोवा फॉरवर्ड

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020

फोंडावासीयांना फोंड्यातील विकास कुठे दिसत नाही, असा टोला लगावत सत्तेच्या खुर्चीसाठी एकप्रकारे फोंडावासीयांची पालिकेकडून थट्टाच चालल्याचा आरोप गोवा फॉरवॉर्डचे फोंडा प्रमुख राजेश वेरेकर यांनी केला.

फोंडा-  फोंडा पालिकेत सध्या फोडाफोडीचे राजकारण चालले असून विकासकामे रखडली आहेत. पालिकेत सत्तेसाठी पक्षांतर जोरात चालले असून पक्षांतर करणारे नगरसेवक विकासकामांसाठी पक्षांतर करीत असल्याचे सांगत असले तरी फोंडावासीयांना फोंड्यातील विकास कुठे दिसत नाही, असा टोला लगावत सत्तेच्या खुर्चीसाठी एकप्रकारे फोंडावासीयांची पालिकेकडून थट्टाच चालल्याचा आरोप गोवा फॉरवॉर्डचे फोंडा प्रमुख राजेश वेरेकर यांनी केला.

फोंड्यात आज (गुरुवारी) गोवा फॉरवर्डतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत राजेश वेरेकर यांनी फोंड्यातील रखडलेले प्रकल्प आणि येत्या निवडणुकीसंबंधी भाष्य करताना गोवा फॉरवॉर्डला संधी देऊन पहा, असेही आवाहन केले. फोंड्यातील गोवा फॉरवॉर्डच्या कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला कुर्टी - खांडेपार पंचायतीचे पंच शैलेश शेट तसेच सांतान फर्नांडिस उपस्थित होते. 

फोंड्यात गेल्या 2014 साली सुरू झालेला पूर्वीचा सिग्नेचर व आताचा गोल्डन ज्युबिली प्रकल्प रखडला आहे. या प्रकल्पासाठी आतापर्यंत अडीच कोटी रुपये खर्च करण्यात आले, मात्र काम पूर्णपणे बंद असून हे काम बंद का आहे, याची चौकशी करून प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पालिकेने पुढाकार घ्यावा, असे राजेश वेरेकर म्हणाले.
गेल्या वर्षी खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी फोंड्यातील अर्धवट मार्केट संकुलाची पाहणी केली होती प्रकल्पाचे रखडलेले काम तीन महिन्यांत पूर्ण होईल, असे आश्‍वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले होते, मात्र हे कामही सुरू झालेले नाही. या संकुलातील दुकानांचा लीलाव झाल्यानंतर मार्केट संकूल बंदच असल्याने दुकाने घेतलेल्यांना काय फायदा होणार याचा आधी पालिकेने विचार करावा, आणि अर्धवट काम त्वरित पूर्ण करण्यासाठी कार्यवाही करा, असे राजेश वेरेकर म्हणाले.

फोंड्यातील घरगुती गॅस पाईपलाईनच्या कामाचाही असाच बोजवारा उडाला आहे. राज्यात घरगुती गॅस कनेक्‍शन मिळवणारे फोंडा शहर प्रथम असेल, असे त्यावेळी सांगण्यात आले होते, मात्र हे कामही रखडलेले आहे. फोंड्यातील हनुमान तीर्थ तळीचे सुशोभिकरणाचे कामही हाती घेण्यात आलेले नाही. वास्तविक गोवा फॉरवॉर्डचे मंत्री विनोद पालयेकर यांनी या कामाची कार्यवाही करण्यासाठी पुढाकार घेतला होता, मात्र गोवा फॉरवॉर्डला भाजपने सत्तेतून हटवल्यानंतर आता सरकारने हे कामही सुरू केलेले नाही. 

कोरोनामुळे मजूर तसेच इतर सामान मिळणे कठीण झाल्याने मध्यंतरीच्या काळात विकासकामांवर परिणाम झाला, हे सर्वांना माहीत असले तरी कोरोनाच्या पूर्वी आणि आता लॉकडाऊन उठवून सर्व व्यवहार सुरू झाले तरी रखडलेले प्रकल्प का मार्गी लागत नाही, असा सवाल राजेश वेरेकर यांनी केला. 

पंच सांतान फर्नांडिस यांनी गोवा फॉरवॉर्डचे माजी मंत्री जयेश साळगावकर यांनी पुढाकार घेऊन खांडेपार येथील पंचायत घराचे काम करण्यासाठी कार्यवाही केली होती, पण हे कामही अजून सुरू झाले नसल्याचे सांगितले. एकंदर सगळ्याच कामांच्याबाबतीत नन्नाचा पाढा असून स्थानिक आमदारही अनास्था दर्शवत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

संबंधित बातम्या