अंजुणे धरणातून पाण्याचा विसर्ग

Dashrath Morajkar
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

गेल्या दोन दिवसांपासून चोर्ला घाट आणि केरी परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने अंजुणे धरणात पाण्याचा संचय वाढत चालला आहे. त्यामुळे आज धरणाचे चारही दारे खुली करून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. आज दुपारी धरणाचे चारही दरवाजे खुले करून ३४ क्युसेस प्रती सेकंद या गतीने धरणातील पाणी वाळवंटी नदीला सोडण्यात येत आहे.

पर्ये
२१ जुलै रोजी अंजुणे धरणाने आपल्या जलाशयाची पातळी ८९.४ मीटर गाठल्यावर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला होता, पण तद्‍नंतर पाऊस कमी झाल्याने पाण्याचा विसर्ग कमी करून धरणाची पातळी मर्यादित ठेवली होती. गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा जोर धरल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा संचय होत राहिल्याने धरणातून पाण्याच्या विसर्गाला सुरवात झाली आहे. आज संध्याकाळी धरणाची पाण्याची पातळी ९१.३४ मीटर एवढी होती, तर धरण ८९ टक्के भरलेले आहे. या भागात अजूनपर्यंत २७३६ मि. मी. पाऊस झाला आहे.
दरम्यान, आज दिवसभर मुळसदर पाऊस पडत असल्याने केरी- पर्येतून वाहणारी वाळवंटी नदी ओसंडून वाहत होती. त्यात अंजुणे धरणाचे पाणी सोडल्याने नदीची पातळी बरीच वाढली होती.

संपादन - यशवंत पाटील

संबंधित बातम्या