‘सर्वांगसुंदर गणपती चित्रशाळे’तर्फे गणेशमूर्तीवर सवलत

मंगेश बोरकर
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

यंदा ‘कोविड-१९’मुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे लोकांची आर्थिक स्थिती नाजूक बनली आहे. लोकांना दोन किंवा अडीच हजार किंमतीच्या श्रीगणेशाच्या मूर्ती परवडणाऱ्या नाहीत याची जाण आम्हाला आहे. त्यामुळे आमच्या पारंपरिक गिऱ्हाईकांनी पूर्वीच नोंद केलेल्या मूर्ती सोडून इतर गणेशमूर्ती आम्ही सवलतीच्या दरामध्ये देणार आहे, अशी माहिती तुळशीदास नाईक यांचे सुपूत्र प्रितम यांनी दिली. 

फातोर्डा
राज्यातील आघाडीचे व प्रसिद्ध मूर्तिकार तुळशीदास नाईक यांच्या मालकीच्या ‘सर्वांग सुंदर गणपती चित्रशाळे’तर्फे भक्तांना श्री गणेशमूर्तीवर सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा ‘कोविड-१९’मुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे लोकांची आर्थिक स्थिती नाजूक बनली आहे. लोकांना दोन किंवा अडीच हजार किंमतीच्या श्रीगणेशाच्या मूर्ती परवडणाऱ्या नाहीत याची जाण आम्हाला आहे. त्यामुळे आमच्या पारंपरिक गिऱ्हाईकांनी पूर्वीच नोंद केलेल्या मूर्ती सोडून इतर गणेशमूर्ती आम्ही सवलतीच्या दरामध्ये देणार आहे, अशी माहिती तुळशीदास नाईक यांचे सुपूत्र प्रितम यांनी दिली. 
सवलतीच्या गिऱ्हाईकांकडून पैशाची मागणी करणार नाहीत. त्यांना बाकी असलेल्या मूर्तीमधून कुठलीही मूर्ती निवडता येईल व त्या परवडणार एवढा विडा ठेवून मूर्ती नेता येतील, असे प्रितम याने सांगितले. आम्ही यंदा श्री गणेशमूर्तीच्या किंमतीत वाढही केली नाही व वाजवी दरात या मूर्ती आम्ही विकणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. 
चुतुर्थीच्या आदल्या दिवशी किंवा त्या दिवशी सकाळी मूर्ती नेण्यासाठी गर्दी होते. लोकांची गैरसोय होऊ नये आणि सामाजिक अंतराचा फज्जा होऊ नये म्हणून यंदा मडगावी आम्ही तीन केंद्रे उघडली आहेत. एक चंद्रवाडा (फातोर्डा), दुसरे आके व तिसरे मालभाट येथे ही केंद्रे आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. 
आपले वडिल तुळशीदास हे गेल्या ५० वर्षांपेक्षा जास्त काळापासून श्री गणेशमूर्ती तयार करीत आहेत. त्यांच्यासोबत आता स्वतः मी, प्रवीण, प्रमोद व आमचे भावोजी विठ्ठल नाईक मिळून मार्च महिन्यांपासून गणपतीच्या मूर्ती तयार करण्यास सुरवात करतात. आषाढी एकादशीपासून आम्ही मूर्तीची नोंदणी करण्यास सुरवात करतो. आम्ही गोव्याबाहेरुन मूर्ती आणीत नाहीत. स्वतः तयार करतात व आमच्याकडे पगारी कामगारही नाहीत. त्यामुळे आम्हाला वाजवी दरात श्री गणेशमूर्ती विकणे परवडते, असेही त्यांनी सांगितले. 
आम्ही दर वर्षी ५५० ते ६०० गणेशमूर्ती तयार करतो. यंदा जरी लोकांनी मूर्तीची लांबी कमी पसंत केलेली असली तरी मूर्तीची संख्या कमी झालेली नाही. याच्या उलट यंदा ६५० ते ७०० मूर्ती आम्ही बनविल्या आहेत. याचे कारण कारवार, बांदा येथे जाऊन जे गणेशोत्सव साजरा करीत असत, त्यांनी यंदा येथेच हा उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते. अशा कित्येक लोकांनी आमच्याकडे मूर्तीची नोंदणी केली आहे, असेही त्यांनी सांगितले. 
सरकारकडून आम्हाला एका मूर्तीमागे १०० रुपये एवढे अनुदान मिळते असेही त्याने स्पष्ट केले. तुळशीदास नाईक हे उत्तम कलाकार असून त्यांचा राज्य स्तरावर व अनेक कला संस्थांकडून सन्मान झालेला आहे.

संपादन ः संदीप कांबळे

संबंधित बातम्या