‘सनबर्न’सारख्या आठ पार्ट्यांच्या आयोजनावर चर्चा! सुदिन ढवळीकरांनी टाकला बॉंबगोळा

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

राज्यात रेव्हपार्ट्या तसेच सनबर्नसारख्या एकूण आठ पार्ट्यांसह उत्तर व दक्षिण गोव्यात प्रत्येक महिन्याला किमान एक छोटी पार्टी आयोजित करण्यासंबंधीच्या विषयावर विवांता या पंचतारांकित हॉटेलात चर्चा झाली असल्याचा आपला दावा असल्याचा बॉंबगोळा माजी उपमुख्यमंत्री तथा आमदार सुदिन ढवळीकर यांनी टाकला आहे.

फोंडा: राज्यात रेव्हपार्ट्या तसेच सनबर्नसारख्या एकूण आठ पार्ट्यांसह उत्तर व दक्षिण गोव्यात प्रत्येक महिन्याला किमान एक छोटी पार्टी आयोजित करण्यासंबंधीच्या विषयावर विवांता या पंचतारांकित हॉटेलात चर्चा झाली असल्याचा आपला दावा असल्याचा बॉंबगोळा माजी उपमुख्यमंत्री तथा आमदार सुदिन ढवळीकर यांनी टाकला आहे. विवांतातील या बैठकीला अभिनेता कपिल झवेरी, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर तसेच फोंड्यातील एक व्यक्ती भोजेपाटील आदी उपस्थित होते आणि याप्रकरणी खुद्द मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या कोअर कमिटी सदस्यांनी स्पष्टीकरण द्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

राज्यातील रेव्ह पार्टी आणि ड्रग्ज व्यवहार यावरून सध्या राजकीय खळबळ उडाली असून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. हणजूण येथील रेव्ह पार्टीशी संबंधित अभिनेता कपिल झवेरी याचे राजकीय नेत्यांशी कोणते लागेबंधे आहेत, फिल्मस्टार सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण आणि या प्रकरणाला जोडून आलेला अंमली पदार्थाचा व्यवहार यावरूनही राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना आता माजी उपमुख्यमंत्री तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना तीन प्रश्‍न विचारले आहेत. या तिन्ही प्रश्‍नांची उत्तरे द्या आणि जनतेसमोर सत्य काय ते आणा असा आग्रह सुदिन ढवळीकर यांनी दिला आहे. 

रेव्ह पार्टीशीसंबंधित कपिल झवेरी, फोंड्यातील एक व्यक्ती भोजे पाटील, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा एकत्रित जो फोटो प्रसिद्ध झाला आहे, तो कधी घेतलेला आहे, मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये घेतला आहे की नाही, हा फोटो कोणत्या दिवशीचा व वेळ कोणती आणि तिसरा प्रश्‍न म्हणजे मुख्यमंत्री सोडून अन्य तिघेही विवांता हॉटेलात दुपारी ते संध्याकाळी साडेचारपर्यंत बैठकीला होते की नाही आणि पावणेपाचच्या दरम्यान ही तिघेही जेव्हा बैठकीतून बाहेर आले तेव्हा, आपण त्यांना भेटलो होतो की नाही, आणि विवांता हॉटेलची सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून मुख्यमंत्र्यांनी मागवून घेतली आहे की नाही, असे तीन प्रश्‍न सुदिन ढवळीकर यांनी विचारले आहेत. 

कॅनडा लीग क्रिकेट स्पर्धेत तीन पाकिस्तानी खेळाडूंच्या सहभागासंबंधी लीलाव झाला, त्या लीलावावेळी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर व भाजपचे सावर्डेचे अध्यक्ष देसाई असल्याचा दावा करून यासंबंधीचेही स्पष्टीकरण भारतीय जनता पक्षाने द्यायला हवे, असे सुदिन ढवळीकर म्हणाले.

एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी अंमलीपदार्थांचा चाललेला खुलेआम व्यवहार रोखण्याची आणि युवा पिढीला व्यसनाधीनतेपासून वाचवण्यासंबंधीची भाषा करतात, पाकिस्तानकडून प्रत्येकवेळेला भारतावर दहशतवादी कारवाया केल्या जात असल्याने भारतीयांनी पाकिस्तानला वाळीतच टाकले आहे, अशा वेळेला तीन पाकिस्तानी खेळाडूंना मोठ्या रकमा देऊन भाजपचेच पदाधिकारी आपल्या संघासाठी घेतात, हा काय प्रकार आहे, असा सवालही सुदिन ढवळीकर यांनी केला आहे.  विवांता हॉटेलमधील बैठकीतील सहभागी एकाने तर चक्क येणारा पर्यटन सिझन हा आमचा असल्याचा दावा केला असून यापुढे आयपीएल तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी "बेटिंग''संबंधीही चर्चा झाली असल्याचे आपल्याला कळले आहे. अशाप्रकारच्या घातक कारवायांबाबत खल करून गोवा विकण्यास काढण्याच्या या प्रकाराचा उलगडा आता खुद्द मुख्यमंत्र्यांनीच आणि राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी केला पाहिजे, असे सुदिन ढवळीकर यांनी सरकार आणि भाजपला आव्हानच दिले आहे. 

‘कोविडसाठी प्लाझ्मा दान द्या’
कोरोनापासून बचावासाठी प्लाझ्मा दान करण्यासाठी युवकांनी पुढे यावे, असे आवाहन आमदार सुदिन ढवळीकर यांनी केले आहे. आपण कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर आपल्यावर उपचार करणाऱ्या मणिपाल इस्पितळाचे डॉक्‍टर्स तसेच परिचारिका व इतरांचे तसेच आपल्यासाठी प्लाझ्मा दान दिलेल्यांचे त्यांनी आभार मानले असून कोरोनातून बचावासाठी एका विशिष्ट व्हेंटीलेटरची आवश्‍यकता असून आपल्या माहितीप्रमाणे राज्यात बांबोळी इस्पितळ तसेच खाजगी इस्पितळात मिळून पंचवीसपेक्षा जास्त नसून ही संख्या वाढवण्याची आवश्‍यकता आहे. आपण यापूर्वीच कोरोना रुग्णांसाठी आवश्‍यक सुविधा उपलब्ध करण्यासंबंधी मागणी केली होती, ती अभावानेच पूर्णत्वास येत असल्याचे दिसत असून सरकारने याप्रकरणी गांभीर्याने घ्यावे, असेही सुदिन ढवळीकर म्हणाले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या