मास्क न घालणाऱ्या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करणाऱ्या पोलिसांना ''ती'' गाडी का दिसत नाही?

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 29 डिसेंबर 2020

हरमल किनारी भागांत सध्या नंबर प्लेट नसलेल्या दुचाकींची चर्चा जोरात असून मास्क न घालणाऱ्या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करणाऱ्या पोलिसांना ''ती'' गाडी दिसत नाही का, त्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

हरमल: हरमल किनारी भागांत सध्या नंबर प्लेट नसलेल्या दुचाकींची चर्चा जोरात असून मास्क न घालणाऱ्या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करणाऱ्या पोलिसांना ''ती'' गाडी दिसत नाही का, त्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

एरवी स्थानिकांच्या गाडीस फॅशनेबल नंबरप्लेट असल्यास दंड ठोठावणारे पोलीस, सदर गाडीबाबत कारवाई का करीत नाहीत असा सवाल नागरिकांनी केला आहे.सदर गाडी चोरीची असण्याची शक्यता व संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे.

गेले कित्येक दिवस सदरहू बुलेट गाडी नंबर प्लेटविना फिरत आहे त्या गाडीस मागचे सीट व पंखा नसून दोन्ही नंबर प्लेट गायब असल्याचे आढळले.अलीकडे संध्याकाळच्या वेळेत हरमल व पेडणे स्थानकाचे पोलिस अधिकारी कोविडमुळे मास्क परिधान न केलेल्या पर्यटकांवर कारवाई करताना दिसले होते.

परवा सांताक्लॉजच्या वेषात मास्क वाटप करीत होते.मात्र वाहतूक नियमांचे उल्लंघन करून दिवसाढवळ्या पोलिसादेखत चकरा मारणाऱ्या उद्दाम पर्यटकास रोखण्याचे सामर्थ्य नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
सदरहू दुचाकी चोरीची असल्याचा दाट संशय असून दोन्ही नंबरप्लेट गायब आहे शिवाय निष्पाप पादचारी वा कुणालाही ठोकरून पळ काढण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक बाबली पेडणेकर यांनी दिली.

विदेशी पर्यटक सध्या विमनस्क स्थितीत वावरत असून अश्या दुचाकीमळे स्थानिक नागरिकांना मनस्ताप सोसावा लागू नये असे मत पेडणेकर यांनी व्यक्त केले.विदेशींच्या मॉडीफायड गाड्यांच्या कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनिप्रदूषण होत असून परिसरातील नागरिकांना नाहक मनस्ताप सोसावा लागतो. तरी पेडणे वाहतूक खात्याचे अधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांनी याबाबत कठोर कारवाई करावी व उद्दाम पर्यटकांना वठणीवर आणावे अशी 
मागणी केली आहे.

संबंधित बातम्या