Tourist Attacked in Anjuna : पर्यटक-स्थानिक वाद गोव्याच्या प्रतिमेस मारक !

खंडणीसाठी धमक्यांचाही आरोप : मुख्यमंत्र्यांनी सक्त ताकीद दिल्यानंतरही प्रकार थांबेनात
Attacked on Tourist in North Goa
Attacked on Tourist in North GoaDainik Gomantak

(योगेश मिराशी)

पर्यटकांवरील वाढते हल्ले, मारहाणीचे प्रकार, वारंवार पर्यटक-स्थानिकांमध्ये उडणारे खटके, वादविवाद तसेच किनारी भागांत प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली मागितली जाणारी खंडणी, अशा विविध कथित आरोपांमुळेच सध्या गोव्याची पर्यटन प्रतिमा खराब होत आहे.

या पार्श्वभूमीवर नुकताच मुख्यमंत्र्यांनी पर्यटकांशी गैरवर्तन केल्यास याद राखा, अशी सक्त तंबी दिली होती. तरीही हे वाद कमी होण्याचे नाव घेत नाहीत.

त्याचप्रमाणे, बुधवारी मध्यरात्री हणजूणमध्येच एका चारचाकी गाडीने आपल्याला ओव्हरटेक केल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन स्थानिकांनी मुंबईमधील एका पर्यटकास बेदम मारहाण केल्याचे प्रकरण घडले. नंतर पोलिसांनी या संशयितांना अटक केली.

दरम्यान, आमदार मायकल लोबोंनी केलेल्या कथित खंडणीसंदर्भातील आरोपांविषयी पोलिस स्थानकात किंवा तपास यंत्रणेकडे कुठलीही लेखी तक्रार दाखल झालेली नाही.

अशा किनारी भागांतील न संपणाऱ्या गैरप्रकारांमुळे रोज नव्याने गोव्याला राष्ट्रीय स्तरावरील माध्यमांत वाईट गोष्टींसाठी प्रसिद्धी मिळत आहे. आणि ही बाब सध्या गोव्यासाठी खूपच बाधक ठरतेय.

Attacked on Tourist in North Goa
Leopard Caught At Fatorpa: वांते - फातर्पा येथे बिबट्या जेरबंद

पर्यटकांचा आदरच; पण चूक दोघांची !

अतिथी देवो भवः या उक्तीप्रमाणे आम्ही पर्यटकांचा आदर राखला पाहिजे. अलीकडे काही घटनांमुळे गोव्याचे नाव माध्यमांमध्ये झळकत आहे. ही बाब योग्य नाही,असे मत आमदार मायकल लोबो यांनी व्यक्त केले.

हणजूणमध्ये घडलेला मारहाणीच्या प्रकरणात पर्यटक तसेच स्थानिक या दोघांची चूक होती. मुळात अशी भांडणे होऊ नयेत. कारण या घटनांमुळे सर्वत्र चुकीचा संदेश जातो. गोवा हे सुरक्षित पर्यटनस्थळ आहे.

अनेकदा पर्यटक हे दारूचे अतिसेवन करून हॉटेलमध्ये भांडण उरकून काढतात. तेव्हा हॉटेलवाल्यांनी अशा पर्यटकांना सांभाळून घेत त्यांना टॅक्सीत बसवून रूमकडे पाठवावे.

हणजूण प्रकरणात आता नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आले. त्यात पर्यटकांनीच वाद सुरू केला होता. परंतु, पर्यटकांनाच मारहाण झाली, असा संदेश सर्वत्र गेला. हे प्रकार गोव्यासाठी मारक ठरताहेत,असेही लोबो म्हणाले.

Attacked on Tourist in North Goa
Valpoi Police : शिगमोत्सवात हरवलेल्या 4 वर्षाच्या मुलाचा अखेर शोध लागला; वाळपई पोलिसांची कामगिरी

‘त्या’ कुटुंबावरील हल्ल्याप्रकरणी पाच जणांना अटक

उपलब्ध माहितीनुसार, दि. 5 मार्च रोजी एका दिल्लीतील पर्यटक कुटुंबावर प्राणघातक हल्ला झाला. हे प्रकरण राज्यातच नव्हे, संपूर्ण देशभर गाजले. कारण या कुटुंबातील सदस्याने गोव्यात पर्यटक सुरक्षित नाहीत, असा दावा करून सोशल मीडियावर व्हीडिओ व्हायरल केला होता.

परिणामी, गोव्याचे नाव पुन्हा एकदा वाईट गोष्टींसाठी राष्ट्रीय पातळीवर गाजले. त्यानंतर राज्य पोलिस यंत्रणा सक्रिय झाली. पोलिसांनी याप्रकरणी पाच संशयितांना अटक केली आहे.

यावेळी मारहाणीवेळी स्थानिक गँगकडून तलवारीचा वापर झाला होता, असे आधी सांगण्यात आले. मात्र, हे दावे ‘स्पाझिओ रिसॉर्ट’कडून खोडून काढण्यात आले.

मुळात स्विमिंग पूल ठिकाणी धूम्रपानास मज्जाव केल्याने दिल्लीच्या पर्यटकांनी रिसॉर्ट कर्मचाऱ्याला शिवीगाळ ,मारहाण केली. नंतर वाद विकोपाला गेला, असे पत्रकात म्हटले आहे.

दिल्लीतील अश्वनी कुमार यांच्या कुटुंबासोबत घडलेला हा प्रकार खेदजनक आहे, मात्र या वादाची सुरवात कुटुंबानेच केली होती, असा रिसॉर्टने दावा केलाय.

चूक उमगल्याने स्थानिक चालकाचा माफीनामा

  1. केरळमधून काही पर्यटकांना घेऊन आलेल्या खासगी बसचालकास स्थानिक बसचालकाने धमकी दिल्याचा एक व्हिडिओ समोर आला. या प्रकारानंतर आपली चूक उमगलेल्या त्या स्थानिक बसचालकाने नंतर सोशल मीडियावर आपला माफीनामा पोस्ट केला.

  2. हा कथित धमकीचा प्रकार तीन दिवसांपूर्वी सिकेरी येथे घडलेला होता. केरमळमधील एक टुर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनीची बस पर्यटकांना घेऊन गोव्यात आली होती.

  3. तेव्हा या स्थानिक बसचालकाने केरळहून तुम्ही पर्यटकांना आणून येथे साईट सीन करू लागल्यास आम्ही गोव्यातील बसवाल्यांनी काय करावे? असा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच पुन्हा पर्यटकांना आणल्यास वाहनांची तोडफोड, जाळपोळ करू, असा दम दिला होता.

  4. या प्रकारानंतर सोशल मीडियावर स्थानिक बसचालकावर टीका झाली. नंतर त्याला आपली चूक उमजली व त्याने नंतर दुसरा एक व्हिडिओ पोस्ट करून सोशल मीडियावर याप्रकरणी माफी मागितली.

हॉटेल मालकाकडे पाच लाखांच्या खंडणीची मागणी !

कळंगुटचे आमदार मायकल लोबोंनी आरोप करीत दावा केला होता की, किनारी भागांतील हॉटेल्स व रेस्टॉरंट मालकांकडून काही गुंडांकडून खंडणी मागितली जात आहे. मात्र, याविषयी लोबोंनी कुठलीही लेखी तक्रार तपास यंत्रणेकडे केली नव्हती.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, या गुंडांनी पाच लाख रुपये संबंधित हॉटेल मालकांकडे मागितले होते. आणि या खंडणीबहाद्दरांचे राजकीय गॉड फादर आहेत. त्यामुळेच ते उघडपणे अशाप्रकारे लोकांकडे ‘प्रोटेक्शन मनी’च्या नावाने खंडणीवजा हफ्ते मागताहेत, असेही सूत्रांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com