आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर मंत्री मायकल लोबो यांचा सरकारला घरचा आहेर

आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर मंत्री मायकल लोबो यांचा सरकारला घरचा आहेर
micheal lobo.jpg

पणजी: भारतीय घटनेच्या परिशिष्ट 10 नुसार दोन तृतीयांश आमदारांचा गट एका राजकीय पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करू शकतात. त्यानुसार काँग्रेसच्या दहा आमदारांना प्रवेश दिला होता. या प्रक्रियेला गोवा खंडपीठात आव्हान दिलेल्या याचिकेवर पुढील विधानसभेपूर्वी निवाडा होणे गरजेचे आहे. जनतेचे याकडे लक्ष लागून आहे, असे मत मंत्री मायकल लोबो यांनी व्यक्त करून सरकारला घरचा अहेर दिला आहे. (Disqualification petition of MLAs needs to be decided before Assembly elections, says Michael Lobo)

काँग्रेसचा दहा आमदारांचा गटाने फुटून भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा मंत्री मायकल लोबो हे उपसभापती होते. भाजपात प्रवेश केलेल्या दहा आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात गोवा खंडपीठात याचिका सादर झाली आहे. या संदर्भात बोलताना मंत्री लोबो म्हणाले की, त्या सर्वांना प्रवेश भारतीय घटनेच्या 10 व्या परिशिष्टानुसार देण्यात आला आहे. घटनेतील परिशिष्टाबाबत उच्च न्यायालयाची व्याख्या किंवा अर्थ वेगळा असू शकतो. त्यावर न्यायालय आपला निर्णय देऊ शकतो. या परिशिष्टानुसार प्रवेश करण्यापूर्वी आमदाराने राजीनामा द्यावा व प्रवेश करावा किंवा दोन तृतियांश गट राजिनाम्याशिवाय प्रवेश करतो यापैकी पर्याय येऊ शकतो. 

मतदार आमदाराला तो कोणत्या पक्षाच्या तिकिटावर उभा राहिला आहे त्याकडे पाहून व विश्‍वास ठेवून मतदान करत असतात. त्यामुळे लोकांना विश्‍वासात न घेता असे निर्णय घेणे कुठे तरी थांबायला हवेत. उच्च न्यायालयानेही अशा प्रकरणावर कायमचा पडदा टाकून ऐतिहासिक निवाडा द्यावा जो देशात सर्व राज्यांना लागू होईल. जे आमदार भाजपवासी झाले त्यांना मतदान करून चूक केली की, बरोबर होते. यासाठी या निवाड्याकडे लोकांचेही लक्ष आहे.

भारताची लोकशाही जगात मोठी आहे. त्यामुळे या लोकशाहीचे मूल्य व आत्मा अबाधित ठेवण्यासाठी तसेच अशा प्रकरणांना आळा बसवण्यासाठी हा निवाडा महत्त्वाचा ठरणार आहे. भारतीय घटनेच्या 10 व्या परिशिष्टनुसार उच्च न्यायालयाची व्याख्या किंवा त्याचा अर्थ वेगळा असू शकतो. हा निवाडा येत्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी तरी होण्याची गरज आहे, असे मत विधानसभेचे आमदार म्हणून व्यक्त करतो असे मंत्री लोबो म्हणाले.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com